पोटच्या दोन मुलांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून 'त्यांनी' दत्तक घेतली 11 गरीब मुलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 02:08 AM2018-09-16T02:08:35+5:302018-09-16T06:23:21+5:30
आपल्या दोन्ही मुलांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेतील भटक्या व गरीब कुटुंबांतील ११ मुले दत्तक घेतली
लासुर्णे : लासुर्णे येथील पाटीलवस्ती जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दिलीप बापूराव काळे यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेतील भटक्या व गरीब कुटुंबांतील ११ मुले दत्तक घेतली आहेत. काळे यांनी या मुलांना वर्षभर लागणारे सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य ते देणार आहेत. आज त्यांनी दोन्ही मुलांचा वाढदिवसाचा खर्च टाळून या मुलांना शैक्षणिक साहित्य, गणवेश वाटप केले. तसेच शाळेतील सर्व मुलांना गोड खाऊचे वाटप केले. त्यांच्या दोन्ही मुलांचे वाढदिवस सप्टेंबर महिन्यात येतात.
काळे यांचा मोठा मुलगा अमित यूपीएससी परीक्षेत राज्यात पहिला व देशात नववा आला होता. सध्या त्यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावरून कॅप्टनपदावर पदोन्नती झाली आहे. तर दुसरा मुलगा अक्षय स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. पाटीलवस्ती शाळेत सर्व गोरगरीब कुटुंबातीलमुले शिकत आहेत. शैक्षणिक साहित्याअभावी त्यांची हेळसांड होत होती. परंतु, आता ही मुले आवडीने शाळेत येत आहेत.
यापूर्वीही काळे यांनी टकलेवस्ती (लासुर्णे) येथील वैदू या भटक्या समाजातील मुलांची भटकंती थांबवून उल्लेखनीय शैक्षणिक कार्य केल्याने महाराष्ट्र शासनाने त्यांची दखल घेवून त्यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरव केला आहे. काळे यांनी नंदिनी राठोड, राज राठोड, अक्षय गायकवाड, आयुष काळे, सोनाली मोहिते, यश काळे, सुयश काळे, अनिषा काळे, अंजली मेहिते व रूकसाना शेख या मुलांना दत्तक घेतले आहे.