ढिसाळ नियोजनाचा फटका
By admin | Published: February 15, 2017 02:43 AM2017-02-15T02:43:27+5:302017-02-15T02:43:27+5:30
जळगाव येथे बहिणाबाई महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका, अभिनेत्री केतकी माटेगावकर हिला आयोजकांच्या
पुणे : जळगाव येथे बहिणाबाई महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका, अभिनेत्री केतकी माटेगावकर हिला आयोजकांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला. कार्यक्रमस्थळी पोलीस सुरक्षा, बाउन्सर्स अथवा खाजगी सुरक्षारक्षकही नसल्याने तिला व्यासपीठावरून उतरणे अशक्य झाल्याने तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. या प्रकाराबद्दल तिचे वडील पराग माटेगावकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, कोणत्याही कलाकाराबाबतीत असा प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आयोजकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
जळगाव येथे ११ फेब्रुवारीला बहिणाबाई महोत्सवामध्ये सायंकाळी ७ वाजता गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम संपल्यानंतर तिला भेटण्यासाठी अनेकांनी व्यासपीठाकडे गर्दी केली. आयोजकांनी सुरक्षेची कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे केतकी माटेगावकर हिला बाहेर पडणे अशक्य झाले. हा सर्व प्रकार घडत असताना आयोजक काहीच करू शकले नाही. केतकीचे वडील पराग माटेगावकर स्वत: तिच्यासोबत होते. त्यामुळे केतकीच्या जीवाला काही त्रास झाला नाही. स्थानिक महिलांनी साखळी करून, तिला गाडीपर्यंत जाण्यासाठी मदत केली. या सर्व प्रकाराचा प्रचंड त्रास केतकी आणि तिच्या वडिलांना सहन करावा लागला.
हा प्रकार माटेगावकर यांनी शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांना सांगितला. जळगाव येथील बहिणाबाई महोत्सवात आयोजकाच्या हलगर्जीपणामुळे गायिका केतकी माटेगावकर हिच्या जीवाला धोका निर्माण झाला. त्यामुळे आयोजक दीपक परदेशी यांच्यावर तत्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालक डॉ. सतीश माथूर यांच्याकडे केली आहे.