अंधाऱ्या कोठडीप्रमाणे दयनीय अवस्था
By admin | Published: March 14, 2016 01:17 AM2016-03-14T01:17:30+5:302016-03-14T01:17:30+5:30
शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काचा निवारा देण्यासाठी शासकीय वसाहती उभ्या राहिल्या खऱ्या... पण या वसाहतीतील सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले
शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काचा निवारा देण्यासाठी शासकीय वसाहती उभ्या राहिल्या खऱ्या... पण या वसाहतीतील सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधाही मिळेनाशा झाल्या़ वसाहती बकाल झाल्या. या वसाहतींना ‘लोकमत टीम’ने ‘आॅन द स्पॉट’ पाहणी करून समोर आणले ज्वलंत वास्तव.प्रवीण गायकवाड ल्ल शिरूर
काम एकविसाव्या शतकातले, निवासस्थान मात्र एकोणिसाव्या शतकातले. कौलारू, दगड-मातीची अरुंद घरे, घरात जाण्यास साडेपाच फुटी दरवाजा, खिडक्यांचा अभाव, यामुळे अंधार कोठडीप्रमाणे असलेल्या अतिशय दयनीय अवस्थेतील घरांमध्ये (वसाहतीमध्ये) येथील पोलीस राहतात. खोल्या वीस, स्वच्छतागृह फक्त चार, तीही अस्वच्छ. तसेच, घाणीच्या सान्निध्यात ‘मजबुरी आहे काय करणार,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया येथे राहणारे कर्मचारी व्यक्त करतात.
९ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या प्रशासकीय इमारतीच्या बाजूलाच पोलिसांची वसाहत आहे. शेजारीच पोलीस स्टेशन आहे. २४ तास ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसमोर एकविसाव्या शतकातील आव्हाने आहेत. यासाठी पोलीस ठाण्यात इंटरनेट सेवा, गुन्ह्याच्या तपासासाठी डिजिटल सुविधा आदींची व्यवस्था आहे. वाढते नागरीकरण, वाढता परिसर यामुळे कामाचाही मोठा व्याप पोलिसांना आहे. अशात काम आटोपून घरी जाणे म्हटले, तर १८९४ मध्ये बांधलेल्या कोंबड्याच्या खुराड्याप्रमाणे असणाऱ्या खोलीमध्ये पोलिसांना आसरा घ्यावा लागतो. घर मोठे नसावे, मात्र किमान त्यात चांगला श्वास घेण्यासाठी खिडक्या तरी असाव्यात. पोलीस वसाहतीमध्ये खिडक्यांच्या अभावाने व दाराची उंची कमी असल्याने सुख मिळत नाही.राहायला छप्पर नसेल, तर काय काम करणार ?
नीलेश काण्णव ल्ल घोडेगाव
घोडेगाव येथे असलेल्या पोलीस निवासस्थानाची अतिशय दुरवस्था झाली आहे. सध्याची इमारत दुरुस्त करावी, अशी मागणी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करण्यात आली आहे. मात्र निधी उपलब्ध नसल्यामुळे दुरुस्ती करता येत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. दिवस व रात्री काम करून थकणाऱ्या पोलिसांच्या डोक्यावरचे छप्पर चांगले नसेल, तर तो काय काम करणार, अशी संतप्त प्रतिक्रया काही पोलिसांनी व्यक्त केली. सुमारे २५ वर्षांपूर्वी ही पोलीस निवासस्थाने बांधण्यात आली आहेत.
दरम्यान, तीन इमारतींमध्ये २४ फ्लॅट आहेत. हे फ्लॅट ३०० ते ३५० चौरस फुटाच्या अंत्यत छोट्या आकाराचे आहेत. यातील खोल्यांची साईजही खूप छोटी आहे. त्यात या इमारतीची दुरवस्था झाली असून, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, दरवाजे तुटलेले, रंग निघून गेलेला, ड्रेनेजची पाइपलाइन फुटलेली, उघड्यावर पाणी साठलेले, अशी अवस्था आहे. या इमारतींना संरक्षक भिंत नसल्यामुळे पलीकडे असलेल्या ओढ्यातून अनेक वेळा साप येतात, त्यांचाही धोका असतो.