पॉप्युलर बूक हाऊस घेतेय वाचकांचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 02:56 PM2018-03-09T14:56:45+5:302018-03-09T14:56:45+5:30
पुणे : लेखक, खेळाडू, अभिनेते, राजकीय नेते, उद्योगपती, गायक, शास्त्रज्ञ, शासकीय व पोलीस अधिकारी अशा दिग्गजांचे फर्ग्युसन रस्त्यावरील पॉप्युलर बूक हाऊसशी स्नेहबंध निर्माण झाले.
पुणे : गेली ६४ वर्षे हजारो वाचक, लेखक, प्राचार्य, ग्रंथपालांचे हक्काचे साहित्यस्थान असलेले फर्ग्युसन रस्त्यावरील पॉप्युलर बूक हाऊस वाचकांचा निरोप घेत आहे. करमणुकीची नवी साधने, वाचनाकडील कमी झालेली ओढ या कारणांमुळे पुस्तकविक्री घटल्याने हे बूक हाऊस बंद करण्याची वेळ ओढवली आहे. चार-पाच वर्षांपासून पुस्तकविक्रीचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. वाचनप्रेमी दुकानामध्ये येईनासे झाले आहेत. त्यामुळे बूक हाऊस काळाच्या पडद्याआड जाणार आहे.
पुस्तकांबरोबरच सीडी, व्हीसीडी,डिव्हीडी, आॅडिओ बुक्स, किंडल असे कालानुरुप होत गेलेले बदल ‘पॉप्युलर’ने सहज स्वीकारले. पहिले आॅनलाईन बुक स्टोर्स सुरू केले होते. मात्र, काही काळाने ते यशस्वीपणे चालू शकले नाही. फेसबुक, व्हाट्सअप, ईमेलच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांच्या कायमच संपर्कात राहिलो. ‘टीम पीबीएच’ ह्या व्हाट्सअप ग्रूपने अनेक मित्र दिले. ह्या ग्रूपद्वारे आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवू शकलो, अशी प्रतिक्रिया सुनील गाडगीळ यांनी व्यक्त केली. परिस्थिती बदलली, आवड, प्राधान्यक्रम बदलल्या आणि बुक हाऊस बंद करावे लागणार ह्या कटू सत्याला सामोरे जाण्यासाठी मनाची तयारी केली. त्याच जागेत लवकरच एका नव्या रुपात, नव्या स्वरूपात आपल्या सेवेस येत आहोत, असेही ते म्हणाले.
माधव लक्ष्मण गाडगीळ यांनी १० आॅक्टोबर १९५४ रोजी पॉप्युलर बुक हाऊसची स्थापना केली. लेखक, खेळाडू, अभिनेते, राजकीय नेते, उद्योगपती, गायक, शास्त्रज्ञ, शासकीय व पोलीस अधिकारी अशा दिग्गजांचे बूक हाऊसशी स्नेहबंध निर्माण झाले. वाचकांच्या तीन चार पिढया दुकानाशी जोडल्या गेल्या. पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, विक्रम गोखले, पं. हृदयनाथ मंगेशकर, अनुराधा पौडवाल, बाळासाहेब ठाकरे यांनी दुकानाला भेट दिली होती. देशा-परदेशातील वाचकांचेही हे आवडीचे ठिकाण होते.
------------------
पुस्तकप्रेम आणि व्यवहार यामध्ये व्यवहाराची सरशी झाली. पुस्तकविक्रीचे प्रमाण घटल्याने तोटा सहन करत आणखी किती काळ दुकान सुरू ठेवायचे ही चिंता भेडसावत होती. ग्राहकांचा ओघ कमी झाल्याने पुस्तकांची विक्री होत नसल्याच्या कारणास्तव काही कर्मचाºयांना कमी करण्याची वेळ ओढवली. वर्षभर विचार केल्यानंतर आता हे दुकान बंद करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. दुकानातील उर्वरित माल वितरकांकडे पोहोचविल्यानंतर चार-पाच दिवसांत दुकान औपचारिकरित्या बंद होणार आहे. लवकरच आम्ही एका नव्या स्वरूपात पुणेकरांसमोर येणार आहोत.
- सुनील गाडगीळ