पोर्शे अपघात: निबंधाची शिक्षा भोवणार? बाल न्याय मंडळाच्या ‘त्या’ सदस्याची होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 12:33 PM2024-05-30T12:33:29+5:302024-05-30T12:47:34+5:30

विशेष म्हणजे त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.

Porsche Accident: Punishment for Essay? 'That' member of Juvenile Justice Board will be investigated | पोर्शे अपघात: निबंधाची शिक्षा भोवणार? बाल न्याय मंडळाच्या ‘त्या’ सदस्याची होणार चौकशी

पोर्शे अपघात: निबंधाची शिक्षा भोवणार? बाल न्याय मंडळाच्या ‘त्या’ सदस्याची होणार चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: पोर्शे कार अपघातात अभियंता तरुण-तरुणीचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन बाळाचा जामीन मंजूर करणे बाल न्याय मंडळाच्या सदस्यांना चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण, या सदस्यांची चौकशी करा, असे आदेश महिला आणि बाल न्याय मंडळाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी एक समितीदेखील स्थापन केली आहे.

कल्याणीनगर परिसरात आलिशान पोर्शे कारच्या धडकेत दुचाकीवरील अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन बाळ मद्यपान करून ही कार चालवत होता. तरीही अपघातानंतर अवघ्या १५ तासांत आरोपीला बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला. तसेच बाळाला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती. त्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. त्याची दखल घेत प्रशासन कामाला लागले आहे. ही चौकशी समिती या प्रकरणाची पूर्णपणे पडताळणी करून त्याचा अहवाल आयुक्त नारनवरे यांच्याकडे सादर करणार आहे.

काय दिली होती शिक्षा?

आरोपीने १५ दिवस येरवडा ट्रॅफिक कॉन्स्टेबलसोबत चौकात उभे राहून वाहतुकीचे नियोजन करावे, दारू सोडवण्यासाठी उपचार घ्यावेत, अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहावा, भविष्यात अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यास मदत करावी, असे  बाल न्याय मंडळाने त्याला जामीन देताना सांगितले होते.

‘त्या’ पबच्या चौघांचा जामीन लांबणीवर

  • बाळासह त्याच्या मित्रांना मद्य पुरवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कोझी व ब्लॅक पबच्या मालकांसह कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी केलेला अर्ज लांबणीवर पडला. पोलिसांकडून म्हणणे सादर न झाल्याने पुढील सुनावणी १ जून रोजी होईल.
  • अपघातानंतर बाळाचे वडील विशाल अग्रवाल, कोझी पबचा मालक, व्यवस्थापक, ब्लॅक पबचा मालक, कर्मचारी, काऊंटरचा व्यवस्थापक यांना या गुन्ह्यात अटक केली. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांच्या जामिनावर बुधवारी पोलिसांकडून म्हणणे सादर झाले नसल्याने जामिनावरील सुनावणी १ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे.  


पाेर्शे कार अपघाताचा ‘एआय’ करणार उलगडा

  • विशाल अग्रवाल याच्या वकिलांनी न्यायालयात अपघातग्रस्त पोर्शे कारमध्ये तांत्रिक समस्या असल्याचा दावा केला होता. त्याची तक्रारही कंपनीकडे केल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता. 
  • या पार्श्वभूमीवर पोलिस एआय प्रणालीचा वापर करत या अपघाताची घटना जिवंत करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
  • पोर्शे कंपनीची एक टीम मुंबईवरून पुण्यात दाखल झाली होती. या कारची तपासणी करण्यासाठी जर्मनीवरूनही तंत्रज्ञ पुण्यात येणार आहेत. त्यामुळे अग्रवाल याच्या वकिलांनी न्यायालयात केलेला दावा खरा की खोटा, हे ठरवण्यास मदत हाेणार आहे.


डाॅ. तावरे, डाॅ. हाळनाेर निलंबित

पुणे : बाळाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी अटक झालेल्या दोन्ही डॉक्टरांना निलंबित करण्यात आले. यात ससून रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि अपघात विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांचा समावेश होता. त्यांना बुधवारी निलंबित करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण विभागाने हे आदेश काढले. न्यायवैद्यकशास्त्र विभागातील शिपाई अतुल घटकांबळे यालाही निलंबित केले.

आरोपीने किती अल्कोहोलचे सेवन केले, त्याची तपासणी करण्यासाठी रक्ताचा नमुना काढण्यात आला. मात्र, ड्यूटीवर असलेल्या डॉ. हाळनोर याने तपासणीसाठी पुढे दुसरेच रक्त पाठवले होते. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार त्याच दिवशी सायंकाळी औंध जिल्हा रुग्णालयातून पुन्हा दुसरा रक्ताचा नमुना घेतला आणि तो डीएनए करण्यासाठी पाठवला होता. आरोपीचा डीएनए मॅच न झाल्याने ही हेराफेरी लक्षात आली.

नियम काय सांगतो?

कोणताही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी ४८ तासांपेक्षा जास्त काळ पोलिस कोठडीत असल्यास त्याचे निलंबन करण्यात येते. यानुसार डॉ. तावरे, डॉ. हाळनोर या दोघांच्याही पोलिस कोठडीला ४८ तास उलटल्याने वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दोघांचे निलंबन केले आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली.

अल्कोहोल टेस्ट काय?

अल्कोहोलचे सेवन केल्यावर त्याचा अंश रक्तामध्ये सर्वसाधारणपणे ८ ते ९ तास राहतो. काहींच्या बाबतीत तो १२ तासांपर्यंतही राहू शकतो; परंतु ती व्यक्ती कधी पिली, तिची शरीरयष्टी कशी आहे, ती सतत दारू पिते का? यानुसार अल्कोहोलचे रक्तातील अंशाचे प्रमाण कमी किंवा जास्त राहते, अशी माहिती ससून रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

बंगळुरू आरटीओने कारची तात्पुरती नोंदणी रद्द करावी, असे पत्र पुणे ‘आरटीओ’कडून पाठविले. कारने दुचाकीला धडक दिली, तेव्हा तिचा वेग ताशी १६० किलोमीटर होता. पोर्शे कंपनीच्या नऊ सदस्यांच्या पथकानेही सोमवारी तपासणी केली असून, त्याचा अहवाल त्यांनी पोलिसांकडे सोपवला आहे.
- संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Porsche Accident: Punishment for Essay? 'That' member of Juvenile Justice Board will be investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.