सकारात्मक आयुष्याची प्रेरणा
By admin | Published: May 8, 2017 03:28 AM2017-05-08T03:28:05+5:302017-05-08T03:28:05+5:30
‘एकल महिलांना आधार देणारे आणि मनमोकळेपणाने व्यक्त व्हायला लावणारे अभया मैत्री गटाचे व्यासपीठ आहे. एकमेकींना
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘एकल महिलांना आधार देणारे आणि मनमोकळेपणाने व्यक्त व्हायला लावणारे अभया मैत्री गटाचे व्यासपीठ आहे. एकमेकींना भावनिक आधार देत सक्षमपणे उभे करण्याचे काम येथे होते. संघर्षातही सकारात्मक आयुष्य जगण्याची प्रेरणा महिलांना या मैत्री गटातून मिळतेय, ही आनंदाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन समुपदेशिका स्मिता जोशी यांनी केले.
‘वंचित विकास’च्या अभया मैत्री गटातर्फे आयोजित ‘अभया सन्मान-२०१७’ प्रदान सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी माजी नगरसेविका सुनंदा गडाळे, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर, संचालिका सुनीता जोगळेकर, मीना कुर्लेकर, देवयानी गोंगले आदी उपस्थित होते.
स्मिता जोशी म्हणाल्या, ‘एकटेपणाची जीवन जगताना तिला कोणाचातरी आधार हवा असतो. तो आधार आपणच एकमेकींना दिला पाहिजे. अडचणीत असलेल्या महिलांना आधार देण्यासाठी अभयासारख्या गटांबरोबर जोडून घेतले पाहिजे. चौकटीबाहेरचा विचार करण्याची प्रेरणाही या गटात मिळते.’
सुनंदा गडाळे म्हणाल्या, ‘प्रत्येकाला आपले दु:ख मोठे वाटते. मात्र, या अकरा अभयांचा संघर्ष ऐकल्यानंतर आपले दु:ख काहीच वाटत नाही.
प्रतिभा शिंदे, मीनाक्षी नागरे, चैत्राली वाघ, माया नवाडे, अनिता निकम, लीनता साने यांनी मानपत्र वाचन केले. देवयानी गोंगले यांनी सूत्रसंचालन केले व आभार
मानले.
नेहा क्षीरसागर
यांचा विशेष गौरव
आयुष्यात एखाद्या वळणावर जोडीदाराचा हात सुटल्यानंतर वडिलांच्या एकटेपणाचा विचार करून त्यांना पुनर्विवाहास मदत करणाऱ्या व प्रोत्साहन देणाऱ्या नेहा क्षीरसागर यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. नेहा क्षीरसागर यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या वडिलांना उर्वरित आयुष्यात जोडीदाराचा आधार मिळाला आहे.
यांचा झाला सन्मान
प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत स्वत:च्या पायावर उभ्या राहिलेल्या अनुजा पाटील, डॉ. विदुला लागू, रत्नप्रभा निंबाळकर, अंजली पूजाधिकारी, अंजली महाजन, शुभदा यादव, कल्पना कुलकर्णी, मालती जोशी, माधवी कुंभार, अर्चना डोंगरे आणि छाया कुलकर्णी या ११ महिलांचा मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.