दिलासादायक! भयभीत पुणे शहरातील पश्चिम भागात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 01:07 PM2020-04-23T13:07:49+5:302020-04-23T13:11:49+5:30
औध-बाणेर व कोथरूड-बावधानमध्ये कोरोनाचा फैलाव नाही : तीन रूग्णांंपैकी दोन कोरोनामुक्त
निलेश राऊत-
पुणे : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे संपूर्ण पुणे शहर भयभित झाले असताना, याच पुण्यातील पश्चिम भागातील महापालिकेच्या दोन वार्डांमध्ये कोरोनाचा फैलाव मात्र होऊ शकलेला नाही. औंध-बाणेर व कोथरूड-बावधान या दोन वार्डामध्ये मार्चच्या अखेरीस अनक्रमे दोन व एक असे तीन रूग्ण आढळले होते. परंतू, एक महिन्यानंतरही येथील परिस्थिती जैसे थे च असून, जे तीन कोरोनाबाधित रूग्ण होते त्यापैकी दोन जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर रूग्णालयात उपचार घेणाऱ्या या तिसऱ्या रूग्णाचा पुनर्तपासणी अहवालही निगेटिव्ह आला आहे.
कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आल्यावर किंबहुना कोरोनाचा चाहुल लागताच पुणे महापालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने कोरोनाला प्रतिबंध करण्यास प्रारंभ केला. परदेशातून आलेले प्रत्येक नागरिकाची तपासणी केली. यामध्ये औंध-बाणेर वार्ड येथे परदेशातून आलेला एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला व काही दिवसातच त्याच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले़ तर कोथरूडमध्येही लंडनहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने त्याला मार्चच्याच शेवटच्या आठवड्यात नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, शहरातील अन्य भागात कोरोनाचा फैलाव वाढत असताना, सुदैवाने या दोन्ही वार्डामध्ये अन्य कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे २२ एप्रिलपर्यंत केलेल्या तपासणीत आढळून आलेले नाही.
बाणेर येथे परदेशातून आलेल्या संबंधित व्यक्तीमुळे त्याच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामुळे ती व्यक्ती राहत असलेल्या बिल्डींगमधील इतर दोन कुटुंबातील दहा सदस्यांची तपासणी करण्यात आली तर कोथरूड येथील रूग्णांच्या संपकार्तील १६ जणांचीही तपासणी करण्यात आली. या सर्व हाय रिस्क व्यक्तींचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले.
दरम्यानच्या काळात लॉकडाऊन पुकारण्यात आले़ यामुळे या दोन्ही परिसरात सोशल डिस्टसिंग, कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांना होम क्वारंटाईन करणे आदी प्रशासकीय उपाययोजनांची अंमलबजावणी इतर ठिकाणाप्रमाणेच सुरू होती. सुदैवाने येथे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांची साथ मिळाल्याने कोरोनावर मात करून त्याचा फैलाव रोखता आला. येथे बहुतांशी भाग हो सोसायट्यांचा असल्याने अनेक सोसायट्यांनी सोसायटीतील सदस्यांना व बाहेरच्या सदस्यांना सोसायट्यांमध्ये प्रवेश प्रतिबंधित केला. तर या भागात असलेल्या झोपडपट्टी किंवा दाट लोकवस्तीच्या भागात तपासणी मोहिम राबवून तब्बल सव्वाचार लाख नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये औंध-बाणेर येथे २४ व कोथरूडमध्ये ९४ जणांची सर्दी खोकला व अन्य लक्षणे असल्याने तपासणी करण्यात आली. या तपासणीत ते निगेटिव्ह आढळून आले आहेत.
या दोन्ही ठिकाणी सर्व्हेचा टप्पा पूर्ण झाला असून, अद्याप तरी येथे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण नव्याने आढळून आलेले नाहीत. दरम्यान शहरातील मध्यवर्ती भाग वगळता इतर उपनगरीय भागांतही कोरोना संसर्ग वाढीचा वेग कमी असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मध्य पुण्यात मात्र मोठ्या संख्येने रुग्ण वाढले आहेत. भवानी पेठ, कसबा-विश्रामबाग या मध्यवर्ती भागासह ढोले-पाटील रस्ता, येरवडा-धानोरी, हडपसर- मुंढवा येथील दाटवस्तीच्या भागात मोठ्या प्रमाणात एप्रिल महिन्यात वाढ झाली असली तरी आता खबरदारी हाच यावर एकमेव उपाय आहे.
----------------------------
पश्चिम भागात कोरोनाचा संसर्ग न होणे ही दिलासादायक बाब - महापौर
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, आजपर्यंत तरी शहराच्या पश्चिम भागात कोरोनाचा संसर्ग होऊ शकला नाही ही दिलासादायक बाब आहे. या ठिकाणी सोसायट्यांमध्ये सोशल डिस्टसिंग व अन्य भागात लॉकडाऊनच्या नियमांचे पालन चांगले झाल्याचे आत्तापर्यंत तरी आढळून आले आहे. यामुळे येथील तीन रूग्णांची संख्या ही रोखली गेली असली तरी, भविष्यातील धोका टाळण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन होणे जरूरी असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लोकमतच्या माध्यमातून सांगितले.