एकतेतून सकारात्मक समाजनिर्मिती

By admin | Published: March 29, 2017 02:42 AM2017-03-29T02:42:04+5:302017-03-29T02:42:04+5:30

चांगला समाज घडवण्यासाठी माणसा-माणसांतील भेद नाहीसा झाला पाहिजे. प्रत्येक माणसाने जाती, पंथ, धर्म, उच्च-नीच हे सर्व भेद

Positive societies from unity | एकतेतून सकारात्मक समाजनिर्मिती

एकतेतून सकारात्मक समाजनिर्मिती

Next

पुणे : चांगला समाज घडवण्यासाठी माणसा-माणसांतील भेद नाहीसा झाला पाहिजे. प्रत्येक माणसाने जाती, पंथ, धर्म, उच्च-नीच हे सर्व भेद संपूर्णपणे बाजूला ठेवले पाहिजेत. परस्परांबद्दल असलेले प्रेम, विश्वास आणि श्रद्धा या भावनेने संपूर्ण समाज उभा करून आपण एकत्र यायला हवे. या भावनांच्या आधारावर माणूस एकात्मता निर्माण करू शकतो. संपूर्ण राष्ट्रामध्ये विविधता असली तरीदेखील एकात्मतेच्या भावनेवर आपण सकारात्मक समाजाची निर्मिती करू शकतो, असे प्रतिपादन श्रुतीसागर आश्रम फुलगावचे स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले.
हिंदू नववर्ष स्वागत समिती कसबा भागातर्फे कसबा गणपती मंदिर ते शनिवारवाडा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. शनिवारवाड्याच्या प्रांगणात स्वरुपानंद सरस्वती यांच्या हस्ते ग्रामगुढी उभारून गुढीपाडवा साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
महापौर मुक्ता टिळक, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, रिपब्लिकन पार्टीचे महेंद्र कांबळे, हनुमंत साठे, रा. स्व. संघ कसबा भागाचे संघचालक किशोर शशितल, सहसंघचालक सुहास पवार उपस्थित होते.
शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजीमहाराज, राजमाता जिजाऊ, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांवर साकारलेले चित्ररथ सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा गजर, वेत्रचर्म आणि लाठी-काठीची प्रात्यक्षिके पाहण्यासोबत शोभायात्रेचे स्वागत करण्याकरिता पुणेकरांनी गर्दी केली.
पारंपरिक वेशभूषेत घोड्यावर स्वार होऊन शोभायात्रेत सहभागी झालेल्या तरुणी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. कसबा गणपती येथून निघालेल्या शोभायात्रेचा लाल महाल, तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौकामार्गे शनिवारवाड्याच्या प्रांगणात समारोप झाला. मोहन शेटे यांनी सूत्रसंचालन केले.
(प्रतिनिधी)

एकात्मतेतून विकास
 स्वामी स्वरुपानंद म्हणाले, ‘एक राष्ट्र, एक समाज, एक कुटुंब आणि व्यक्तिगत जीवन निर्माण करण्याचे एक आदर्श प्रतीक म्हणजे गुढीपाडवा. या प्रतीकाचा आजचा आरंभाचा दिवस आहे. समाजामध्ये एकात्मता निर्माण झाल्यावर खऱ्या अर्थाने उत्कर्ष होतो, त्याच वेळी विकास होतो.’
आम्ही सर्व नगरसेवक मिळून पुण्यामध्ये परिवर्तन घडवून आणणार आहोत. हे परिवर्तन पुणे शहराच्या विकासाचे, संस्कृतीचे आणि संस्कृती जोपासणारे असेल. हे शहर अत्याधुनिक आणि देशाचा चेहरा-मोहरा बदलणारे ठरेल.
- मुक्ता टिळक, महापौर.

Web Title: Positive societies from unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.