सकारात्मक! पुण्यात गणेशोत्सवात आगीची एकही घटना नाही; साधेपणाने उत्सव साजरा केल्याचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 11:28 AM2020-09-02T11:28:20+5:302020-09-02T11:38:37+5:30
दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस आणि महापालिकेप्रमाणे अग्निशामक दलाकडूनही ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते..
पुणे : कोरोनामुळे यंदा सर्वच सण आणि उत्सव साधेपणाने साजरे केले जात आहेत. यंदाच्या गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. ना कोठे मंडप ना देखावे, ना आकर्षक सजावटी. याचा परिणाम अर्थकारणावर झाला असला तरी सकारात्मक परिणामही पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत आगीची एकही घटना गणेश मंडळांजवळ घडलेली नसल्याची माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली.
दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस आणि महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे अग्निशामक दलाकडूनही ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. मंडळांना त्यांच्या मंडपांमध्ये अग्निप्रतिबंधक व्यवस्था करणे बंधनकारक आहे. मंडळांकडून मोठमोठे देखावे सादर केले जातात. यासोबतच विद्यूत रोषणाईही मोठ्या केली जाते. गणेशोत्सवामध्ये ज्वलनशील पदार्थ, शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटना घडतात. यामुळे अनेकदा अग्निशामक दलाला गर्दीमुळे वेळेत पोचणे शक्य होत नाही. अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशामक दलाचे वाहन आतमध्ये जाऊ शकत नाही. रस्त्यावर देखावे पाहण्यासाठी नागरिक बाहेर पडलेले असताना अग्निशामक दलाच्या जवानांना कसरत करावी लागते.
यंदा मात्र या कसरतीमधून दलाच्या जवानांची सुटका झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांनी शासकीय यंत्रणांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेत तो अमलातही आणला आहे. बहुतांश गणेश मंडळांनी मंदिरातच किंवा मंदिराला लागूनच उभारलेल्या छोट्या मंडपांमध्ये गणपती प्रतिष्ठापित केले आहेत. यंदा देखावेही सादर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे फारशी सजावट व विद्यूत रोषणाई देखील करण्यात आलेली नाही. या सर्व साधेपणाने यंदाच्या उत्सवात गणेश मंडपांमध्ये लागणा-या आगीच्या घटना शून्यावर आल्या आहेत.