पॉझिटिव्हिटी कमी होईना; निर्बंध काही हटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:09 AM2021-07-05T04:09:12+5:302021-07-05T04:09:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या अद्यापही कमी झालेली नाही. रुग्णबाधितांचा दर हा ७.३ टक्के असून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या अद्यापही कमी झालेली नाही. रुग्णबाधितांचा दर हा ७.३ टक्के असून यामुळे ग्रामीण भागातील नियम शिथिल होण्यासाठी नागरिक, व्यापाऱ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. सध्या ग्रामीण भागात ३ स्तरांचे निर्बंध लागू आहेत. ग्रामीण भागात ५ हजार ९७३ क्रियाशील रुग्ण असून, त्यातील सर्वाधिक रुग्ण हे मावळ, खेड, हवेली, मुळशी, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात आहेत. यामुळे ग्रामीण भागात निर्बंध शिथिल होण्यासाठी वाटच पाहावी लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात बाधित रुग्णांची टक्केवारी ही ५ च्या खाली आली होती. यामुळे रात्री १० वाजेपर्यंत निर्बंध शिथिल करण्यात आले होते. यानंतर पुन्हा रुग्ण वाढल्याने ही वेळ सायंकाळी ४ पर्यंत आणण्यात आली. तसेच शनिवारी आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आले. ग्रामीण भागात रुग्णबाधितांचा दर हा ७.३ टक्के असून तो खाली येण्याची चिन्हे नाहीत. गेल्या महिन्याच्या तुलनेत बाधित दरात मोठी घट झाली असली तरी निर्बंध उठण्याची चिन्हे सध्या तरी नाही.
ग्रामीण भागात सध्या ५ हजार ९७३ क्रियाशील रूग्ण आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा ७७ दिवसांचा आहे. सध्या ऑक्सिजन खाटांवर ९.७ टक्के रूग्ण आहेत. गेल्या आठवड्यात २ हजार ८५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. असे असले तरी हवेली, बारामती, मावळ, खेड, शिरूर तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे.
हॉटस्पॉट ग्रामपंचायतींच्या संख्येत गेल्या आठवड्याच्या तुलनेत नाममात्र घट झाली आहे. सध्या ग्रामीण भागात ८८ हॉटस्पॉट आहेत. त्यात जुन्नर, खेड, मावळ तालुक्यांत ही संख्या जास्त आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागातर्फे उपाययोजना सुरू आहेत. बालकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी कंत्राटी पद्धतीने बालरोगतज्ज्ञांची भरती सुरू करण्यात आली आहे. खासगी आणि शासकीय कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन आणि ऑक्सिजनविरहित खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाटेची तीव्रता हळूहळू कमी होत असली तरी भविष्यातील संभाव्य धोका बघता नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता कोरोना नियमावलींची कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
चौकट
नियम मोडणाऱ्यांकडून आठवड्यात वसूल केले ५३ लाख
जिल्ह्यात कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुणे महानगरपालिका, पोलीस, तसेच ग्रामपंचायत आणि नगरपरिषद प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत कोट्यवधींचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र गेल्या सात दिवसांत ७ हजार ३८५ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ५३ लाख २६ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
चौकट
सर्वाधिक क्रियाशील रुग्ण असलेल्या तालुके
हवेली ७२२, बारामती ३२८, मावळ ९९३, खेड ८८९, शिरूर २४०, जुन्नर ६६४, आंबेगाव ४०४
चौकट
सर्वात जास्त क्रियाशील हॉटस्पॉट ग्रामपंचायती
कामशेत(मावळ) ६७, ओतूर (जुन्नर) ४५, नांदेड (हवेली) ४२, नारायणगाव (जुन्नर) ४१, नऱ्हे (हवेली) ३८, वाघोली (हवेली)३७, बावधन (मुळशी) ३५, कोंढवे धावडे (हवेली) ३८, मारूंजी(मुळशी) २९. मांडकी (पुरंदर) २९.