महापालिका मुख्यालय बिगाऱ्यांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 04:17 AM2018-08-23T04:17:37+5:302018-08-23T04:18:20+5:30
महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील जवळपास प्रत्येक खात्यातील साहेबांची व पदाधिकाºयांच्या दालनातील प्रमुख कामे बिगाऱ्यांकडून केली जात आहेत
- राजू इनामदार
पुणे : महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील जवळपास प्रत्येक खात्यातील साहेबांची व पदाधिकाºयांच्या दालनातील प्रमुख कामे बिगाऱ्यांकडून केली जात आहेत. ही कामे करणारे मूळ कारकून व कर्मचारी आवारातील हॉटेलांमध्ये व हे बिगारी त्यांच्या टेबलवर अशी स्थिती सध्या महापालिकेतील बहुसंख्य खात्यांच्या कार्यालयांमध्ये आहे. महापालिकेच्या कायम सेवेत असलेल्या या बिगारी कर्मचाºयांच्या नियुक्त्या प्रभाग; तसेच क्षेत्रीय कार्यालयात असल्या, तरी नगरसेवक किंवा साहेबांच्या वरदहस्तामुळे त्यांचा वावर दिवसभर मुख्यालयातच असतो. वेगवेगळ्या कामांवर नियुक्त असलेले हे कायम सेवेतील बिगारी असे साहेब किंवा पदाधिकाºयांच्या सरबराईत गुंतलेले असल्यामुळे त्यांची मूळ कामे करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने बिगाºयांची भरती केली जात आहे. त्यामुळेच कंत्राटी कर्मचाºयांच्या संख्येत साडेसात हजार इतक्या मोठ्या संख्येने वाढ झाली आहे.
साहेबांसाठी संगणक चालवण्यापासून ते साहेबांचे निरोप घेण्यादेण्यापर्यंतची सर्व कामे या बिगाºयांवर सोपवली जातात. पदाधिकाºयांपासून ते विरोधातील वरिष्ठ नगरसेवकांपर्यंत जवळपास प्रत्येकाजवळ असे बिगारी आहेत. त्यांना कोणीही हात लावू शकत नाही. बिगारी असले, तरी ते बिगाºयाचे काम करीत नसल्यामुळे त्यांचा दरारा महापालिकेत आहे. साहेबानेच कधीकाळी लावून घेतलेल्या किंवा नगरसेवकांच्या कृपेने महापालिका सेवेत आलेल्या बिगाºयांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. साहेब किंवा संबंधित नगरसेवकच त्याला थोड्याच दिवसात मुख्यालयात आणून अनधिकृतपणे का होईना पण तृतीय श्रेणी कर्मचाºयाचा दर्जा देतो व आपल्या सेवेस लावतो.
बिगारी म्हणून भरती झालेली असली, तरी ते मुख्यालय सोडून कधीच कुठे जात नाहीत. मुख्यालयातील प्रत्येक खात्यात हे बिगारी आहेत. त्या खात्यातील कारकुनाचे कामही ते अनेकदा करत असतात. साहेबांचीच त्याला संमती असते. त्यामुळे ते काम ज्या मूळ कारकुनाचे आहे तो कारकून त्याच्या सारख्याच बेकाम झालेल्या कारकुनाबरोबर महापालिकेच्या आवारातील हॉटेलमध्ये अड्डा जमवून बसतो. त्यामुळे मूळ सेवेतील कारकुनाला कोणाला भेटायचे असेल तर ही भेट त्याच्या कार्यालयात नाही, तर आवारातील एखाद्या हॉटेलमध्ये होते. त्यामुळेच महापालिका आवारातील हॉटेल कायम गजबजलेली असतात.
कामच नाही करत
नगरसेवक किंवा साहेबांचा माणूस म्हणून ओळखले जाणारे अनेक बिगारी कर्मचारी प्रत्यक्ष कामच करत नाहीत. त्यांचा सगळा वेळ ‘साहेबाने सांगितलेय म्हणून बाहेर आहे’ असे सांगण्यातच जातो. त्यांच्यावर कोणीही कसलीही कारवाई कधीच करत नाही.
काम दुसरीकडे वेतन मूळ खात्यातच
वेगवेगळ्या खात्यात बिगारी कर्मचारी असतात. कायम सेवेतील एकूण बिगारी कर्मचारी किती व कंत्राटी पद्धतीने घेतलेले किती, याची एकत्रित नोंदच महापालिकेत नाही. प्रत्येक खात्यात स्वतंत्रपणे कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेतले जातात व त्यांच्याकडे कायम सेवेत असलेले बिगारी कर्मचारी नगरसेवक किंवा एखाद्या खात्याचे प्रमुख त्यांच्या खात्यात अनधिकृतपणे घेऊन जातात. त्याचे वेतन वगैरे मूळ खात्यातूनच निघते.
आरोग्य, उद्यान, अतिक्रमण, घनकचरा अशा प्रत्येक खात्यात बिगाºयांची भरती केलेली आहे. त्यांच्याकडे मंजूर असलेल्या पदांवरील कायम सेवेतील बिगारी असे मुख्यालयात आणल्यामुळे त्यांना कामाची अडचण निर्माण होते. काहींना मुख्यालयात आणले जाते तर काहीजण पदाधिकाºयांच्या निवासस्थानी त्यांच्या घरची कामे करत असतात.
पदाधिकारी असल्यामुळे त्यांना ही सवलत दिली जाते. काही वरिष्ठ अधिकाºयांच्याही निवासस्थानी बिगारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ज्या खात्यातून कायम सेवेतील बिगारी असे दुसरीकडे नियुक्त केले जातात त्या खात्याकडून बिगारी हवे आहेत अशी मागणी केली जाते.
ठेकेदार कंपन्यांकडून कंत्राटी पद्धतीने बिगाºयांची भरती केली जाते. यामुळे पालिकेवरील आर्थिक बोजा वाढत चालला असून प्रशासन व पदाधिकारी दोघांनाही त्याला आळा घालण्याची गरज वाटत नाही.
परीक्षा देऊन तृतीय श्रेणीत यावे
बिगारी हे पद चतुर्थ श्रेणीतील पद आहे. त्यासाठी शिक्षण किंवा कोणत्याही विशेष कौशल्याचा निकष नाही; मात्र या पदावर भरती झाल्यानंतर शिक्षण घेतले, विशेष कौशल्य प्राप्त केले तर खात्यांतर्गत परीक्षा देऊन, त्यात उत्तीर्ण होऊन तृतीय श्रेणीत येण्यासाठी म्हणून महापालिकेने राजमार्ग उपलब्ध करून दिला आहे. तृतीय श्रेणीत काम करू इच्छिणाºयांनी या परीक्षेला बसावे. नुकतीच ९० जागांसाठी अशी परीक्षा घेतली गेली असून, त्याचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
- अनिल मुळे, उपायुक्त, आस्थापना विभाग