जिल्ह्यातील ९१ रुग्णालयांत अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:11 AM2021-05-23T04:11:09+5:302021-05-23T04:11:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील रुग्णालयांत आगीसारख्या दुर्घटना घडू नये यासाठी सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील रुग्णालयांत आगीसारख्या दुर्घटना घडू नये यासाठी सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. एकूण ७३७ रुग्णालयांचे ऑडिट करण्यात आले असून, यातील ९१ रुग्णालयांत अनेक त्रुटी आढळूण आल्या आहेत. या ठिकाणी अपघाताची शक्यता असल्याने येत्या दोन आठवड्यांत या त्रुटी दूर करण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले आहे.
मुंबई येथील विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत अनेक रुग्णांचा मृत्यू झाला होता. यांसारख्या घटना जिल्ह्यात घडू नये यासाठी पुणे, पिंपरी आणि ग्रामीण भागातील जवळपास ७३७ रुग्णालयांचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील ७३७ रुग्णालयांचे ऑडिट प्रशासनाने पूर्ण केले. यात आढळलेल्या त्रुटींचे साैम्य, मध्यम आणि गंभीर अशा तीन भागांत वर्गीकरण करण्यात आले. यापैकी ३३० रुग्णालयात साैम्य, ३१६ रुग्णालयात मध्यम, तर ९१ रुग्णालयात गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्या. प्रशासनाने याची दखल घेत या त्रुटी येत्या दोन आठवड्यांत दूर करण्याच्या सूचना केल्या आहे.
या सर्वेक्षणात रुग्णालयातील जिना, आतमधील जागा कमी असल्याचे आढळून आले. अपघात झाल्यास यामुळे जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. काही रुग्णालयात अग्निशमन यंत्रणाच पथकाला आढळलेली नाही. तसेच अनेक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा व्यवस्थित नसल्याचेही पथकाला आढळले. या त्रुटी येत्या काही दिवसांत दुरुस्त करणे शक्य असल्याने त्यांना दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे.
चौकट
ग्रामीण भागात ५८ रुग्णालयात गंभीर त्रुटी
फायर ऑडिटमध्ये पुण्यातील १९२, पिंपरी-चिंचवड येथील १३२, कटक मंडळातील ११, तर ग्रामीण भागातील ४०२ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील ५८ रुग्णालयात गंभीर त्रुटी आढळल्या आहेत.
चाैकट
५६२ रुग्णालयातील इलेक्ट्रॉनिक ऑडिट पूर्ण
इलेक्ट्रॉनिक ऑडिटमध्ये जिल्ह्यातील ७३७ रुग्णालये तपासण्यात आली. त्यातील ५६२ रुग्णालयाची तपासणी पूर्ण झाली. तर १७६ रुग्णालयांची तपासणी बाकी आहे. यात रुग्णालयातील वायरिंग, इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करण्यात आली. त्रुटी आढळलेल्या ठिकाणी त्या दुरुस्त करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
कोट
तपासणी करण्यात आलेल्या, तसेच त्रुटी आढळलेल्या रुग्णालयांना त्या दुरुस्त करण्यासाठी अवधी देण्यात आला आहे. काही रुग्णालयांना डीपीडीसी अंतर्गत निधीही देण्यात आला आहेत. यामुळे या रुग्णालयांनी येत्या काही दिवसांत सर्व त्रुटी दुरुस्त करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
-डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
चौकट
कार्यक्षेत्र एकुण रुग्णालय ऑडिट झालेले रुग्णालय जोखमेचे स्वरूप
साैम्य मध्यम गंभीर
पुणे मनपा १९२ १९२ ११६ ६२ १४
पिंपरी-चिंचवड १३२ १३२ २५ ९४ १३
कटक मंडळ ११ ११ ३ २ ६
पुणे ग्रामीण ४०२ ४०२ १८६ १५८ ५८
एकूण ७३७ ७३७ ३३० ३१६ ९१