जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधत नाट्य संमेलनाचे बिगुल वाजण्याची शक्यता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:07 AM2020-12-28T04:07:19+5:302020-12-28T04:07:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनामुळे १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या आयोजनावर काहीसे विरजण पडले. मात्र, आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनामुळे १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या आयोजनावर काहीसे विरजण पडले. मात्र, आता साहित्य संमेलनाबरोबरच नाट्य संमेलनाच्या नियोजनासंबंधीच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. येत्या १३ जानेवारी रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक होणार आहे. त्यामध्ये संमेलनाच्या आयोजनाबाबत चर्चा होणार असली तरी २७ मार्चच्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त संमेलन घेण्याचा परिषदेकडून विचार सुरू आहे.
परिसंवाद, कार्यशाळा, चर्चासत्र, एकपात्री अविष्कार, व्यावसायिक नाटकांचे सादरीकरण अशी भरगच्च मेजवानी देणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे
यंदाचे १०० वे वर्ष आहे. त्यानिमित्त नाट्य संमेलनाचा जागर संपूर्ण राज्यभर करण्याचे नियोजन नाट्य परिषदेने केले होते. राज्यभरातील ११ विविध ठिकाणांसह तामिळनाडू मधील तंजावर येथे देखील कार्यक्रमांची आखणी केली होती. संमेलनाच्या खर्चासाठी ५० कोटी रूपयांचे अंदाजपत्रक परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीतही मंजूर केले होते. संमेलनासाठी शासनाकडून देखील ५० लाख रूपयांची तरतूद केली. मात्र महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट उदभवल्यामुळे संमेलन पुढे ढकलण्यात येत असल्याचे परिषदेने जाहीर केले. मात्र आता सर्व ’न्यू नॉर्मल’ सुरू झाल्यामुळे साहित्य संमेलनाबरोबरच नवीन वर्षात नाट्य संमेलन घेण्याबाबत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने हालचाली सुरू केल्या आहेत. सरकारच्या नवीन आर्थिक वर्षाला एप्रिलपासून सुरूवात होते. मार्च अखेरीस चालू आर्थिक वर्षातील ताळेबंदीचे सर्व व्यवहार पूर्ण केले जातात. त्यामुळे नाट्य संमेलनासाठी जी तरतूद केली आहे, ती रक्कम नाट्य संमेलन कुठं आणि केव्हा घेणार? याचा प्रस्ताव सादर झाल्यानंतरच मिळू शकणार आहे. त्यामुळे जानेवारी मध्ये बैठक घेऊन संमेलन २७ मार्चच्या जागतिक रंगभूमी दिनापासून घेण्याचा विचार परिषदेकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
--
शासनाने नाट्य संमेलनाच्या आयोजनासंबंधी नाट्य परिषदेकडे पत्राद्वारे विचारणा केली आहे. सर्व व्यवस्थित सुरू झाले तर जागतिक रंगभूमी दिनानिमित्त नाट्य संमेलन करणार आहोत असे आम्ही शासनाला पत्राद्वारे कळविले आहे. शंभरावे नाट्य संमेलन आमच्या कारकिर्दीतील महत्वाचे संमेलन आहे. त्यामुळे ते आम्हाला तितक्याच भव्यदिव्य पद्धतीने करायचे आहे. पूर्वीचं आमचे राज्यव्यापी संंमेलनाचे नियोजन झाले आहे. आता केवळ पुन्हा बैठका घेतल्या की कामाला सुरूवात होऊ शकते.
- शरद पोंक्षे, प्रमुख कार्यवाह, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद