आजही मुसळधार पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 01:06 AM2018-07-17T01:06:43+5:302018-07-17T01:06:56+5:30
रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने जुलै महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद सोमवारी झाली आहे़
पुणे : रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने जुलै महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद सोमवारी झाली आहे़ मंगळवारीही शहरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली़ तो सकाळपर्यंत बरसतच होता़ सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २६़६ मिमी पावसाची नोंद झाली होती़ सकाळीही काही वेळ पावसाचा जोर कमी झाला होता़
दुपारी पुन्हा मुसळधार सरी येण्यास सुरुवात झाली़ सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात ३८ मिमी पावसाची नोंद झाली होती़ त्यानंतर पावसाने थोडीशी उसंत घेतली होती़ रात्री साडेआठ वाजेपर्यंत ४०़४ मिमी पाऊस झाला़
आठवड्यातील पहिलाच दिवस असल्याने कामाला जाणाऱ्या नोकरदारांचे या पावसाने काहीसे हाल झाले़ त्यात सकाळच्यावेळीच शहरातील अनेक ठिकाणी पीएमपीच्या बस बंद पडल्याने वाहतूककोंडीत भर पडली़ पावसामुळे मोठ्या प्रमाणावर मोटारी रस्त्यावर आल्याने तसेच वाहतुकीचा वेग मंदावल्याने अनेक रस्त्यावर वाहतूककोंडी निर्माण झाली होती़
पावसामुळे काही प्रमुख चौकांतील वाहतूक नियंत्रक दिवे बंद पडल्याने काही ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती़ वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रमुख रस्त्यावंर अतिरिक्त बंदोबस्त ठेवला होता़
>दिवसभरात पडलेला ३८ मिमी पाऊस हा जुलै महिन्यातील सर्वाधिक पाऊस आहे़ १ जूनपासून शहरात आतापर्यंत २५०़९ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा १८़७ मिमीने जास्त आहे़ सोमवारी सकाळपर्यंत लोहगाव येथे १५़७ मिमी पाऊस झाला असून आतापर्यंत २२२़३ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ सरासरीपेक्षा तो ४२.२ मिमीने जास्त आहे़ पाषाण येथे सकाळपर्यंत २८़८ मिमी पाऊस पडला आहे़ तेथे आतापर्यंत ३१३़३ मिमी पाऊस झाला आहे़ यंदा २१ जून रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५४़८ मिमी पाऊस झाला होता़ दिवसभरात झालेला हा यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पाऊस आहे़