शहरात आज मुसळधार पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 07:41 AM2017-08-29T07:41:52+5:302017-08-29T07:41:56+5:30
गणरायाच्या आगमनापासून सुरू असलेला पाऊस पुढे आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे़ शहराच्या अनेक भागांत हवेचा दाब कमी झाला
पुणे : गणरायाच्या आगमनापासून सुरू असलेला पाऊस पुढे आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे़ शहराच्या अनेक भागांत हवेचा दाब कमी झाला असल्याने येत्या २४ तासांत शहर व परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़
सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत पुणे शहरात २२़६ मिमी, कात्रज येथे २३़२ मिमी, तर लोहगाव येथे ११़८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ सायंकाळी साडेपाचपर्यंत ४ मिमी पाऊस नोंदविला गेला होता़ पुढील पाच दिवस शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे़ त्यामुळे संपूर्ण गणेशोत्सव काळात पाऊस राहण्याची शक्यता आहे़
पुणे शहरात आतापर्यंत ५३७़ ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ आतापर्यंतच्या सरासरी पावसापेक्षा तब्बल १०७़१ मिमी जादा पाऊस यंदा पाऊस पडला आहे़ लोहगाव येथे आतापर्यंत २००़८ मिमी पाऊस जास्त झाला आहे़