बारामतीत साहित्य संमेलनाची शक्यता धूसर

By admin | Published: July 9, 2015 02:55 AM2015-07-09T02:55:40+5:302015-07-09T02:55:40+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना अनोखी भेट देण्याच्या हेतूने ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा योग बारामतीला.

The possibility of a meeting of Baramati literature was gray | बारामतीत साहित्य संमेलनाची शक्यता धूसर

बारामतीत साहित्य संमेलनाची शक्यता धूसर

Next

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना अनोखी भेट देण्याच्या हेतूने ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा योग बारामतीला जुळून येण्यासाठी साहित्य परिषदेची बारामती शाखा ‘गुडघ्याला बाशिंग’ लावून बसली असली, तरी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र पुन्हा जिल्ह्यातच संमेलन घेण्याची शक्यता जवळपास फेटाळून लावली आहे.
दोन वर्षांपूर्वी पुरंदर तालुक्यातील सासवड गावी संमेलनाचा उत्सव पार पडल्यानंतर पुन्हा बारामतीला संमेलन घेण्याचा कोणताच विचार नसल्याचे संकेत पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे बारामतीकरांच्या आशेवर एक प्रकारे विरजण पडणार आहे.
बारामतीमध्ये आजपर्यंत एकदाही साहित्य संमेलन झालेले नाही. शरद पवार यांचा अमृतमहोत्सव असल्याने त्यांना ही अनोखी भेट दिली जाऊ शकते, म्हणून साहित्य परिषदेची बारामती शाखा या ठिकाणी संमेलन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहे. यासाठी महामंडळावर दबावदेखील टाकला जाऊ शकतो. मात्र, यापूर्वीचा इतिहास पाहिला तर युवा साहित्य संमेलनासह पवारांच्याच वाढदिवसाचे औचित्य साधत नाट्यसंमेलनचा घाटही या ठिकाणी घालण्यात आला होता. यातही संमेलनासाठी दोन-तीनच निमंत्रणे आली असती तर बारामतीमध्ये संमेलन घेण्याचा विचारही झाला असता. मात्र यंदाच्या वर्षी ११ निमंत्रणे आली आहेत.
त्यामुळे इतरही स्थळांचा विचार केला जाऊ शकतो. तूर्तास तरी पुन्हा बारामतीमध्येच साहित्य संमेलन घेणे शक्य होईल असे वाटत नसल्याचे स्पष्ट संकेत पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.
यंदा साहित्य संमेलनासाठी आलेल्या निमंत्रणांमध्ये मराठवाड्यातील हिंगोली, नायगाव, उस्मानाबाद अशी तीन, पिंपरीच्या डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, कलारंग संस्था, कामगार साहित्य संघ अशी तीन, सातारा, बारामती, अक्षरमानव श्रीगोंदा, भालकी (कर्नाटक) आणि अग्रीयुथ फोरम आदी ११ ठिकाणांचा समावेश आहे. मराठवाड्यातील दुष्काळसदृश स्थिती पाहता या ठिकाणी संमेलन होणे तसे दुरापास्त आहे. बेळगावच्या नाट्यसंमेलनाला चढलेला वादग्रस्त रंग पाहता इथे साहित्य संमेलन न घेणेच फायदेशीर ठरणार आहे.
त्यामुळे ११ पैकी सहाच स्थळांचा विचार खऱ्या अर्थाने केला जाणार आहे. त्यातीलही ‘पवारां’च्या गावाला काही प्रमाणात फुलीच मारली जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे संमेलनासाठी केवळ पिंपरी-चिंचवडच्या तीन आणि सातारा, श्रीगोंदा या स्थळांचाच प्रकर्षाने विचार होईल, असे सकृद्दर्शनी दिसत आहे. (प्रतिनिधी)

साहित्य महामंडळ पुण्यात आहे म्हणून शहराच्या आसपासच्या स्थळांचा विचार करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे शहराबाहेरील स्थळांचा प्रामुख्याने विचार केला जाईल. स्थळ निवड समिती काही निवडक स्थळांची पाहणी करेल. त्यानंतर ९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत समितीने सुचविलेल्या स्थळांचा विचार केला जाईल.- प्रकाश पायगुडे,
प्रमुख कार्यवाह, साहित्य महामंडळ

> बारामतीमध्ये आजपर्यंत एकदाही साहित्य संमेलन झालेले नाही. शरद पवार यांचा अमृतमहोत्सव असल्याने त्यांना ही अनोखी भेट दिली जाऊ शकते, म्हणून बारामती शाखा संमेलन घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.
> पिंपरी-चिंचवडच्या तीन आणि सातारा, श्रीगोंदा या स्थळांचाच प्रकर्षाने विचार होण्याची शक्यता.

Web Title: The possibility of a meeting of Baramati literature was gray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.