विद्यापीठ परीक्षा वेळापत्रकामध्ये काही बदलांची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 03:23 AM2019-03-12T03:23:16+5:302019-03-12T03:23:34+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ; आढावा घेण्याचे काम सुरू
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे; मात्र लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्याच दिवशी विद्यापीठाचे पेपर येत असल्यास त्यामध्ये बदल करण्यात येतील, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणूक आणि विद्यापीठ परीक्षांचा कालावधी एकच असल्याने राज्यातील अनेक विद्यापीठांच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये पुणे, नगर व नाशिक हे तीन जिल्हे येतात. २३ एप्रिल रोजी पुणे व नगरमधील लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. त्यानंतर २९ एप्रिल रोजी शिरूर व नाशिकची लोकसभा निवडणुकीचे मतदान होईल. या दोन दिवशी विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षांच्या तारखा येत असल्यास त्यामध्ये बदल केले जाणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून देखील याबाबतचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार येत्या दोन-तीन दिवसांत परीक्षेच्या वेळापत्रकातील बदल कळविले जातील, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मतदानाचा विचार करावा लागणार
लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी विद्यापीठाच्या अनेक कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटी लावण्यात आलेली असते. मतदानाच्या एक दिवस अगोदरच त्यांना बूथवर हजर व्हावे लागते. त्यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकाचा आढावा घेताना याचाही विचार विद्यापीठ प्रशासनाला करावा लागणार आहे.