खाणीत दोन मुले बुडाल्याची शक्यता'
By admin | Published: June 29, 2015 06:41 AM2015-06-29T06:41:43+5:302015-06-29T06:41:43+5:30
मुंबई-बंगळुरू महामार्गालगत ताथवडे येथील ममतानगर परिसरात असलेल्या दगडी खाणीत रविवारी दुपारी दोन मुले बुडाल्याची शक्यता परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
वाकड : मुंबई-बंगळुरू महामार्गालगत ताथवडे येथील ममतानगर परिसरात असलेल्या दगडी खाणीत रविवारी दुपारी दोन मुले बुडाल्याची शक्यता परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. याबाबत अग्निशामक दलाला कळविल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आकडा आणि बोटीच्या साह्याने दिवसभर शोध घेतला. मात्र, चिंध्यांशिवाय हाती काहीच लागत नसल्याने साडेपाचच्या सुमारास शोधकार्य थांबविण्यात आले.
ममतानगर परिसरात सुमारे २० वर्षांपूर्वीची जुनी दगड खाण आहे. या खाणीत बाराही महिने पाणी असल्याने जवळच असलेल्या काळाखडक परिसरातील महिला येथे कपडे धुण्यासाठी येतात. वाहनचालक गाड्या धुण्यासाठी येथे गर्दी करतात, तर काही मुले येथे हौसेखातर पोहायला आणि मासे पकडायला येतात. रविवारी दुपारी एकच्या सुमारास येथे काही महिला कपडे धुवत असताना त्यांना पाण्यात काही पडल्याचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, खाणीच्या कडेला दोघांचे कपडे असल्याने उपस्थित महिलांचा संशय अधिकच बळावला. त्यांनी येथे असलेल्या राहुल कांबळे या तरुणाच्या साह्याने पोलीस नियंत्रण कक्षाला दोन मुले बुडाल्याची माहिती दिली.
त्यानुसार वाकड पोलीस व रहाटणी अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बघ्यांनीही खाणीच्या चारही बाजूंनी मोठी
गर्दी केली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी दुपारी तीनपर्यंत आकड्याच्या साह्याने शोध
सुरू ठेवला. मात्र, काहीही हाती न लागल्याने त्यांनी बोटीच्या
साह्याने शोध सुरू केला. मात्र, सायंकाळी साडेपाचपर्यंत काहीही न सापडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. (वार्ताहर)