दोनचा प्रभाग होण्याची शक्यता
By admin | Published: April 26, 2016 02:08 AM2016-04-26T02:08:37+5:302016-04-26T02:08:37+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७मध्ये होणार असून, ही निवडणूक वॉर्ड की प्रभाग रचनेने होणार, याबाबत उत्सुकता आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७मध्ये होणार असून, ही निवडणूक वॉर्ड की प्रभाग रचनेने होणार, याबाबत उत्सुकता आहे. महापालिकेची निवडणूक प्रभागरचनेनुसार होणार असून, दोन वॉर्डांचा एक प्रभाग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याबाबतचा निर्णय तीन महिन्यांत होणार असल्याचेही सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. केंद्र व राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार गेल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेनेचे सरकार आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील महापालिका ताब्यात याव्यात यासाठी भाजपा, सेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भगवा झेंडा फडकाविण्यासाठी दोन्हीही पक्ष सज्ज झाले आहेत.
प्रभाग की वॉर्ड रचनेवर लक्ष
महापालिकेची २०१२ ची निवडणूक प्रभाग रचनेनुसार झाली होती. त्या वेळी दोन वॉर्डांचा एक प्रभाग याप्रमाणे निवडणूक झाली होती. सत्तांतर झाल्यानंतर महापालिकेची निवडणूक प्रभाग रचनेनुसार करायची की वॉर्ड रचनेनुसार करायची याबाबत सेना-भाजपात एकमत झालेले नाही. (प्रतिनिधी)