11th Admission | अकरावी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 08:01 PM2022-04-18T20:01:15+5:302022-04-18T20:07:47+5:30
जाणून घ्या कशी असेल प्रवेश प्रक्रिया
पुणे : शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जाणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले असून विद्यार्थ्यांना येत्या १ मे पासून प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास उपलब्ध करून दिला जाणार आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही दहावीचा निकाल प्रसिध्द होण्यापूर्वी अकरावी ऑनलाईन प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्याचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे आणि भरलेल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळावा, या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यंदाही मुंबई महानगर क्षेत्र, पुणे- पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रांसह नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने दिले जाणार आहेत. उर्वरित कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश महाविद्यालय स्तरावर दिले जाणार आहेत.
सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांनी याबाबत विद्यार्थी व पालकांना आवश्यक मार्गदर्शन करावे. तसेच प्रवेशाबाबतचे आवश्यक नियोजन व कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिल्या आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रिया प्रत्यक्षात येत्या मे महिन्यात सुरू होणार आहे. परंतु, शिक्षण उपसंचालकांनी विद्यार्थी, पालक, कनिष्ठ महाविद्यालये यांचे उद्बोधन, प्रशिक्षण व जनजागृती करावी, अशा सूचना पालकर यांनी दिल्या आहेत.
कालावधी कार्यवाहीचे टप्पे
एप्रिल २०२२ विद्यार्थी,पालक,महाविद्यालयांमध्ये जागृती करणे
१ ते १४ मे २०२२ संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग १ भरण्याचा सराव
१७ मे ते निकालापर्यंत नोंदणी व प्रवेश अर्जाचा भाग १ भरण्यास प्रत्यक्ष सुरूवात
१७ मे ते निकालापर्यंत महाविद्यालयांनी भरलेली माहिती तपासून व्हेरिफाय करणे
दहावी निकालनंतर पाच दिवस अर्जाचा दुसरा भाग भरण्यास मुदत
दहावी निकालनंतर पाच दिवस विविध कोट्यातील प्रवेश सुरू राहणार
प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या-
अकरावी प्रवेशासाठी या वर्षी सुध्दा तीन नियमित फे-या राबविल्या जाणार आहेत. त्यात पहिल्या फेरीसाठी १० ते १५ दिवस, दुस-या व तिस-या फेरीसाठी प्रत्येकी ७ ते ९ दिवस दिले जाणार आहेत. त्यानंतर विशेष फेरी व उर्वरित विद्यार्थ्यांसाठी प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य फेरी ऐवजी वेटिंग लिस्ट पध्दतीचा अवलंब करून प्रवेश दिले जाणार आहेत.