पोस्ट अॅण्ड टेलिकॉम : कर्मचारी भरती, बांधकाम खर्चात अनियमितता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 06:00 AM2020-03-05T06:00:00+5:302020-03-05T06:00:07+5:30
सांस्कृतिक संकुलाच्या बांधकाम खचार्ची मिळेना बिले खर्चाची
विशाल शिर्के -
पुणे : दि पुणे पोस्ट अॅण्ड टेलिकॉम को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधील कर्मचारी भरतीमधे अनियमितता असल्याचा ठपका चाचणी लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे. संस्थेने बालेवाडी येथे उभारलेल्या सांस्कृतिक संकुलाचा बांधकाम खर्च, कायदेशीर सल्ल्यासाठी झालेल्या मोठ्या खर्चाचा मेळ लागत नसल्याचे गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. अॅ
सहकार विभागाने १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१८ कालावधीच्या चाचणी लेखापरीक्षण अहवालात संस्थेच्या कामकाजावर लेखापरीक्षक सी. बी. गव्हाणकर यांनी ताशेरे ओढले आहेत. विनातारण कर्ज प्रकरणामधे काही कर्जदारांवर वसुलीसाठी कोणतीही कारवाई न करणे, कर्जप्रकरणी जामीनदार न घेणे, थकबाकी असूनही ताळेबंदात थकबाकी न दाखविणे अशा गंभीर त्रुटींवर बोट ठेवण्यात आले आहे.
तसेच, २०१४-१५मधे २ लिपिक आणि एका शिपाई पदाची भरती करण्यात आली. त्यासाठी जाहिरात, मुलाखत अशी प्रक्रिया राबविण्यात आली नाही. तसेच, नियुक्ती आदेश देखील तपासणीवेळी उपलब्ध करुन देण्यात आले नाहीत. या शिवाय २०१७-१८च्या भरतीत एक नेमणूक तर तत्कालीन संचालक मनोहर बरके यांच्या मुलाची करण्यात आली. त्यातही नियुक्ती प्रक्रिया राबवली नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पुण्यात बालेवाडी येथे संस्थेने सांस्कृतिक भवन उभारले आहे. त्यासाठी जमीन ७.४२ आणि बांधकामावर ७.९७ कोटी रुपये खर्च झाले. तर, नोंदणी आणि मुद्रांक खर्च २८ लाख १२ हजार असा १६ कोटी २५ लाख ९७ हजार रुपयांचा खर्च झाला. बांधकामासाठी ७.९७ कोटी रुपये खर्च कसा झाला, याची बिले उपलब्ध होऊ शकली नाहीत. तसेच, पीएमआरडीच्या ५० लाख रुपयांचे चलनही तपासणीसाठी उपलब्ध झाले नसल्याचे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.
------------------
कायदेशीर बाबींवरील अनाकलनीय खर्च
संस्थेने २०१३ ते २०१८ या कालावधीमध्ये कायदेशीर सल्लागार, टॅक्स ऑडिट अशा विविध कारणांसाठी के. के. काशीद यांना ९,५०,३४५ रुपये अदा केले. मात्र, टॅक्स ऑडिट रिपोर्टवर ए. आर. अभंग, आर. एल. अभंग यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे काशिद यांना रक्कम देण्याचे प्रयोजन समजत नाही. अॅड. श्रीकांत कानेटकर यांना ९ फेब्रुवारी २०१८ रोजी ६५ हजार रुपये दिले आहेत. मात्र, त्याची बिले तपासणीसाठी उपलब्ध झाली नसल्याने हा खर्च संस्थेचा आहे, की नाही याचा बोध होत नसल्याचा आक्षेप अहवालात नोंदविला आहे.
000अॅ