लहान मुलांमध्येही उद्भवत आहेत कोविडपश्चात समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:11 AM2021-05-27T04:11:12+5:302021-05-27T04:11:12+5:30
प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : एकीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण कमी होत असताना कोरोनापश्चात समस्यांचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांमध्येही कोरोना ...
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : एकीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण कमी होत असताना कोरोनापश्चात समस्यांचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांमध्येही कोरोना होऊन गेल्यावर चार-सहा आठवड्यांनी सलग तीन-चार दिवस ताप, पोटदुखी, अंगावर पुरळ उठणे, जुलाब, हात-पाय गार पडणे अशी लक्षणे दिसत आहेत. मल्टीसिस्टिम इंफ्लमेटरी सिंड्रोम-इन चिल्ड्रन रिलेटेड टू कोविड (एमआयएस-सी) या आजाराची ही लक्षणे असल्याचे बालरोग तज्ज्ञांचे मत आहे.
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग जास्त प्रमाणात झाला. लाट काहीशी ओसरत असताना कोरोनापश्चात आजार समोर येत आहेत. यापैकीच एक मल्टीसिस्टिम इंफ्लमेटरी सिंड्रोम पुढे येत आहे. या आजारांवरील उपचारांसाठी मुलांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले जाते. मात्र, एकूण कोरोनाग्रस्त मुलांपैकी केवळ ४-५ टक्के मुलांमध्ये हा त्रास दिसून येतो आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असा दिलासा डॉक्टरांनी दिला आहे.
------
लहान मुलांमध्ये गंभीर स्वरूपाच्या कोरोनापेक्षा कोरोना होऊन गेल्यानंतर, चार ते सहा आठवड्यांनी मल्टीसिस्टिम इंफ्लमेटरी सिंड्रोमच्या निदानाची शक्यता असू शकते. यामध्ये शरीरातील एका किंवा जास्त अवयवांवर संसर्गाचा परिणाम झाल्याचे दिसून येते. वेळेत निदान झाल्यास आजारावर मात करता येणे शक्य आहे. मुलांना तिसऱ्या लाटेत जास्त धोका असण्याची शक्यता गृहीत धरून त्यानुसार तयारी केली जात आहे. लहान मुलांच्या लसीची चाचणी जूनपासून सुरू होणार असल्याने प्रत्यक्ष लस उपलब्ध होण्यास पुढील सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुलांना सौम्य स्वरूपाची लागण झाली होती. तिसऱ्या लाटेतही हीच परिस्थिती राहील, असे दिसते. मात्र, ऐनवेळी धावाधाव करण्यापेक्षा आत्तापासूनच तयारी करून ठेवणे हिताचे ठरेल.
- डॉ. संजय नातू, अध्यक्ष, पुणे बालरोग संघटना
----
एमआयएस-सी या आजारासाठी केंद्र सरकारकडून उपचारपद्धतींची मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. लवकर उपचार सुरू झाले की, लहान मुले यातून लवकर बरी होऊ शकतात. आजाराची तीव्रता लक्षात घेऊन त्याप्रमाणे उपचारपद्धती ठरवली जाते. कोरोना होऊन गेल्यानंतर किमान दोन महिने पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत जागृत राहणे गरजेचे आहे.
- डॉ. आरती किणीकर, अध्यक्ष, पुणे विभागीय बालरोग टास्क फोर्स समिती
-----
कोरोनानंतर चार ते सहा आठवड्यांनी विषाणू शरीरात नसला, तरी त्याच्या संसर्गामुळे झालेले परिणाम शरीरात राहतात. या संसर्गामुळे काही अवयवांना नुकसान पोहोचते. किशोरावस्थेतील मुलांमध्ये एमआयएस-सी या आजाराचे प्रमाण अधिक आहे. अतिदक्षता विभागात या मुलांवर उपचार केले जातात. स्टेरॉईड, इम्युनोग्लोब्युलिन अशा औषधांच्या साहाय्याने मुलांवर उपचार केले जातात. १०० मुलांना कोरोनाची बाधा झाली असेल तर त्यापैकी तीन ते चार टक्के मुलांमध्ये मध्यम स्वरूपाचा त्रास तर एक ते दोन टक्के मुलांमध्ये तीव्र स्वरूपाचा त्रास आढळून येतो त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
- डॉ. प्रमोद जोग, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना
-----
इन्फ्ल्यूएन्झा लसीचा कोरोनाशी संबंध नाही
दर वर्षी पावसाळ्यात फ्ल्यूसदृश संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. साधा फ्लू आणि कोरोनाची लक्षणे मिळतीजुळती आहेत. इन्फ्ल्यूएन्झा लसीमुळे पावसाळ्यात संसर्गजन्य फ्ल्यू होण्याची शक्यता कमी होऊ शकते. लहान मुलांमध्ये फ्लूचे प्रमाण कमी झाले तर आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होईल आणि कोरोना उपचारांवर लक्ष केंद्रित करता येईल. त्यामुळे राज्याच्या टास्क फोर्सकडून इन्फ्लूएन्झा लसीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. मात्र, इन्फ्ल्यूएन्झा लसीचा कोरोनाशी कोणताही संबंध नाही, असेही बालरोगतज्ज्ञांनी स्पष्ट केले.