कोरोनानंतरचे पर्यटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:09 AM2021-05-06T04:09:39+5:302021-05-06T04:09:39+5:30

एकूण परिस्थिती लक्षात घेता देशी पर्यटकांची परदेशात जायची ओढ भविष्यात कमी होणार आहे. आशावेळी देशी पर्यटकांवरती लक्ष केंद्रित करणे ...

Post-Corona Tourism | कोरोनानंतरचे पर्यटन

कोरोनानंतरचे पर्यटन

Next

एकूण परिस्थिती लक्षात घेता देशी पर्यटकांची परदेशात जायची ओढ भविष्यात कमी होणार आहे. आशावेळी देशी पर्यटकांवरती लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. वाढत्या शहरीकरणामुळे प्रत्यक्ष शहरात राहणाऱ्या लोकांना त्याच त्या गर्दीचा, मॉल संस्कृतीचा, वाहतूक कोंडीचा, संगणकीय मनोरंजनाचा आणि एकंदरीत धकाधकीचा नागरी जीवनमानाचा कंटाळा आला आहे. अशावेळी शहरापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी जाऊन राहावे आणि सोबत कामही करावे, असे वाटणे साहजिक आहे.

आगामी काळात पर्यटकांना वेगवे‌ळ्या प्रकारे आकर्षित करून पर्यटन व्यवसायास भरभराटी येऊ शकेल. मात्र, सध्याचे वातावरण पाहता पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. उपहारगृह, रिसॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे. त्याचबरोबर पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना साधारणतः पुढील वर्षासाठी करणे व पर्यटकांना आपली निवासे ही आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देणे. तसेच, शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणे. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे उपयुक्त ठरेल.

पर्यटन क्षेत्रात करियर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संधी सध्या उपलब्ध आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि पर्यटन संचालनालय यांच्याकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. महामंडळाकडून न्याहारी निवास आणि महाभ्रमण या योजना आहेत. तर, पर्यटन संचालनालयाकडून कृषी पर्यटन योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा शहरी आणि खेडेगावातील तरुणही उपयोग करून घेत आहेत. तसेच, पर्यटन व्यवसायात करियर करण्यासाठी महाराष्ट पर्यटन विकास महामंडळाने सोलापूर येथे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नोलॉजी या संस्थेमार्फत विविध अभ्यासक्रम राबवले आहेत.

महाराष्ट्रातील विविध हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमध्ये पर्यटनविषयक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यात बी.ए. इन ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, बी.एससी इन ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट,बी.ए. टुरिझम स्टडीज, बी.एससी इन हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, बीबीए ईन ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट, बीबीए इन एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट , बॅचलर ऑफ टुरिझम ऍडमिनिस्ट्रेशन, बी. कॉम वोकेशनल टुरिझम, बी. कॉम इन ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हॉटेल मॅनेजमेंट, ट्रॅव्हल आणि टुरिझम क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. सध्या या क्षेत्राला थोडा फटका बसला असला, तरी कोरोना कालावधीनंतर दोन वर्षांत देशांतर्गत पर्यटनास नक्कीच बहर येईल, अशी खात्री वाटते.

- दीपक हरणे,

प्रादेशिक व्यवस्थापक,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे.

Web Title: Post-Corona Tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.