पुणे विभागीय आयुक्तपदाची धुरा आता सौरभ राव यांच्या हाती; कोरोना संकटाचे असणार तगडे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 03:44 PM2020-08-05T15:44:19+5:302020-08-05T15:44:40+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अगोदरच दिले होते सौरभ राव यांच्या नियुक्तीचे स्पष्ट संकेत.
पुणे : पुणे विभागाचे आयुक्त डाॅ.दिपक म्हैसेकर हे मागील शुक्रवारी (दि.३१) रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी सौरभ राव यांची पुण्याचे नवे विभागीय आयुक्त म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे.
डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्ती स्वीकारली होती. त्याचवेळीउपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी यापुढे पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून यापुढे सौरभ राव काम पाहतील असे स्पष्ट केले होते.त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आहे.
सौरभ राव यांच्याकडे या अगोदर पुण्याचे विशेष अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यापूर्वी त्यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. राव यांच्या पाठीशी असलेला कामाचा प्रदीर्घ अनुभव पाहता त्यांच्या हाती पुणे विभागीय आयुक्तपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
मागील शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. दीपक म्हैसेकर यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी त्यांनी आपल्याला विविध शारीरिक आजार असताना सुद्धा कोरोनाच्या काळात माघार न घेता उलट अहोरात्र मेहनत घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असल्याचे सांगितले. तसेच सर्वसामान्य माणूस ‘केंद्रबिंदू’ मानून काम केल्याची भावना मावळते विभागीय म्हैसेकर यांनी व्यक्त केली होती. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या पत्नी रोहिणी आणि मुलगा अथर्व उपस्थित होते.
पुणे विभागातील पुणे, सोलापूर,सांगली,सातारा,कोल्हापूर अशा पाच जिल्ह्यांची जबाबदारी सौरभ राव यांच्या खांद्यावर असणार आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावात त्यांना या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.