पोस्टाच्या परीक्षेला चुकांचे ‘तिकीट’
By Admin | Published: May 4, 2015 03:21 AM2015-05-04T03:21:20+5:302015-05-04T03:21:20+5:30
पोस्ट विभागाच्या मल्टिटास्किंग स्टाफ (एमटीएस) पदासाठी रविवारी झालेल्या परीक्षेत भाषांतराच्या गंभीर चुका आढळून आल्या आहेत
पुणे : पोस्ट विभागाच्या मल्टिटास्किंग स्टाफ (एमटीएस) पदासाठी रविवारी झालेल्या परीक्षेत भाषांतराच्या गंभीर चुका आढळून आल्या आहेत. काही प्रश्नांचे भाषांतर गोंधळात टाकणारे असल्याने परीक्षार्थीही संभ्रमात पडले. राज्यात ही परीक्षा होत असूनही दक्षिणेकडील एका खासगी एजन्सीला भरती प्रक्रियेचे काम देण्यात आल्याने या चुका झाल्याचे पोस्टातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
पोस्ट विभागामार्फत सध्या पोस्टमन, टपाल रक्षक आणि एमटीएस या पदांच्या २ हजार ४२६ जागांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पोस्टमन व टपाल रक्षक या पदांसाठी मागील महिन्यात परीक्षा घेण्यात आली, तर ‘एमटीएस’साठी राज्यात पुण्यासह २६ केंद्रांवर रविवारी परीक्षा झाली. लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेसाठी १०० प्रश्नांची प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती. त्यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, इंग्रजी व प्रादेशिक भाषा, असे प्रत्येकी २५ प्रश्नांचे चार विषय होते. प्रश्नपत्रिकेतील सामान्य ज्ञान; तसेच गणित विषयासाठी इंग्रजी व मराठी असे दोन्ही भाषांतून प्रश्न दिले होते.
सामान्य ज्ञान विषयातील काही इंग्रजी प्रश्नांचे मराठीत भाषांतर करताना चुका झाल्या आहेत. तसेच, प्रश्नांंना दिलेले पर्यायही चुकविले आहेत. प्रश्नपत्रिकेत ‘महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी नद्या ....यात जाऊन मिळतात.’ असा प्रश्न विचारला आहे. इंग्रजी रूपात दिलेल्या चार पर्यायांमध्ये ‘इंडियन ओशन’ असा एक पर्याय आहे. याचे भाषांतर चक्क ‘हिंदू महासागर’ असे केले आहे. प्रत्यक्षात तिथे ‘हिंदू’ऐवजी ‘हिंदी’ हा शब्द असणे अपेक्षित होते, असे काही परीक्षार्थींनी ‘लोकमत’ला सांगितले.
भरती प्रक्रियेचे कामकाज दक्षिणेकडील एका खासगी एजन्सीला दिले आहे. त्यामुळे भाषांतरात चुका झाल्या असाव्यात. पोस्टामार्फत ही प्रश्नपत्रिका काढण्यात आली नाही, असे पोस्टातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)