जिल्ह्यातील पोस्टल मतदानाचा टक्का ९० पर्यंत वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 07:00 AM2019-05-10T07:00:00+5:302019-05-10T07:00:02+5:30
जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर, मावळ या चारही लोकसभा मतदार संघांची मतदानाची प्रक्रिया नुकतीच पार पडलेली असून आता सर्वांचे लक्ष येत्या २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.
पुणे : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील अधिकाधिक सैनिक मतदारांनी त्यांच्यासाठी राबविण्यात आलेल्या आॅनलाईन प्रक्रियेचा लाभ घेतला आहे. तसेच निवडणूक कामास नियुक्त केलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सुध्दा मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे यंदा पोस्टल मतदानाची टक्केवारी ९० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर, मावळ या चारही लोकसभा मतदार संघांची मतदानाची प्रक्रिया नुकतीच पार पडलेली असून आता सर्वांचे लक्ष येत्या २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सर्व प्रथम टपाली मतपत्रिकांची मोजणी केली जाते. त्यामुळे निवडणूक कामास असणारे कर्मचारी व अधिकारी यांच्या मतपत्रिकांची मतमोजणी केली जाईल. त्यातही यंदा सैनिकांना ऑनलाईन प्रणालीचा वापर करून बारकोड असलेल्या मतपत्रिका देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मतपत्रिकांची मोजणीसाठी विशिष्ट स्कॅनरच्या सहाय्याने केली जाईल.
जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात एकूण ५ हजार ७६० सैनिक मतदार असून सर्वांना ऑनलाईन पध्दतीने मतपत्रिका उपलब्द्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यातील काही मतदारांनी संबंधित लोकसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत मतदान केलेल्या मतपत्रिका पाठविल्या आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ५० टक्के सैनिक मतदाराच्या मतपत्रिका पोहचल्या आहेत. मतमोजणीच्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत प्राप्त होणाऱ्या मतपत्रिकांचाच विचार या निवडणूक प्रक्रियेत केला जाणार असून सकाळी ८ वाजल्यानंतर येणाºया मतपत्रिका गृहित धरल्या जाणार नाही.
पुणे लोकसभा मतदार संघात ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले. त्यामुळे विविध स्तरावर त्यावर चर्चा झाली. परंतु, सैनिक मतदारांच्या मतपत्रिकांचा ओघ पाहता सैनिकांचे मतदान ९० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता,असल्याचे पोस्टल मतदान प्रक्रियेचे समन्वयक व उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी सांगितले.
--
यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत केवळ टपाली पध्दतीने मतदानाचा वापर केला जात होता. त्यामुळे सैनिक मतदारांचे मतदान कमी होत होते. जिल्हा प्रशासनाने पोस्टाने पाठविलेली मतपत्रिका पुन्हा पोस्टानेच परत येण्यास बराच कालावधी जात होता. दरम्यानच्या कालावधीत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होत होती. परंतु, यंदा मतदान प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने अधिक अधिक सैनिक मतदारांना मतदानाचा हक्क बजवता आला. त्यामुळे पोस्टल मतपत्रिकांच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येईल, अशी शक्यता जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.