पोस्टल मतदानाचा टक्का वाढणार ; पोलिसांच्या मतदानतही होणार वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 12:00 AM2019-03-24T00:00:00+5:302019-03-24T00:00:06+5:30
पूर्वी पोस्टाने मतपत्रिका मतदाराला पाठविणे आणि मतदाराने पुन्हा मत मोजणीपूर्वी पोस्टाने पोहच करणे यात वेळ जात होता.त्यामुळे अनेकांना आपला मतदानाचा हक्क बजावता येत नव्हता. मात्र,
पुणे: लोकसभा निवडणूकीमध्ये अधिकाधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा; या उद्देशाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विविध मोहिमा राबविल्या जात आहेत. लष्करात सेवेत असणा-या जवानांपासून निवडणूकीचे काम करणारे अधिकारी कर्मचारी आणि बंदोबस्तास असणा-या पोलिसांच्यामतदानाचा टक्क्का वाढविण्यासाठीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पोस्टल बॅलेटचा मतदानाचा टक्का वाढेल,अशी शक्यता निवडणूक प्रक्रियेतील वरिष्ठ अधिका-यांकडून व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जागृतीबाबत कार्यक्रम राबविले जात आहेत.त्याचबरोबरच प्रत्यक्षात मतदान केंद्रावर जावून मतदान करता येऊ न शकणा-या मतदारांना उपलब्ध असणा-या पयार्यांची माहिती दिली जात आहे. पूर्वी पोस्टाने मतपत्रिका मतदाराला पाठविणे आणि मतदाराने पुन्हा मत मोजणीपूर्वी पोस्टाने पोहच करणे यात वेळ जात होता.त्यामुळे अनेकांना आपला मतदानाचा हक्क बजावता येत नव्हता. मात्र,मतदान आणि मतमोजणी यांच्यात तब्बल एक महिन्याचे अंतर आहे. त्यामुळे पोस्टाने पाठविलेली प्रत्येक मतपत्रिका मत मोजणीपूर्वी पोहचण्याची शक्यता वाढली आहे. त्याचप्रमाणे पोस्टल मतदान कसे करावे; याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेकडून पोलिसांसह महसूल व इतर कार्यालयातील कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
प्रामुख्याने लष्करातील नोकरीच्या माध्यमातून देशसेवा करणा-या जवानांना व अधिका-यांना मतदान करताना अडचणी येत होत्या. मात्र,या लोकसभा निवडणूकीत या मतदारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार लष्करात सेवेत असणा-या जिल्ह्यातील २४ विधानसभा मतदार संघांतील सुमारे ५ हजार जवानांनी व अधिका-यांनी जिल्हा प्रशासनाकडे नमुना अर्ज -२ भरून दिला आहे.त्यातील काही मतदारांच्या बाबत अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही. या मतदारांना सी-डॅकच्या सहकार्याने तयार केलेल्या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून संगणकावर मतपत्रिका पाठविल्या जाणार आहेत.त्यामुळे त्यांना पोस्टल मतदान करणे शक्य होणार आहे. मतदान व मत मोजणी यांच्यात एक महिन्याचे अंतर असल्याने या मतदारांची मतदानाची टक्केवारी ५ ते १० टक्क्यांहून ७० ते ८० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
.............
पोस्टल मतदान अर्ज भरताना अनेक वेळा चूका होतात. त्यामुळे मतपत्रिका मिळत नाही किंवा बाद होते. तसेच अर्ज कसा भरावा , याबाबत माहिती नसल्यामुळे पोलिसांकडून मतदानाकडे दूर्लक्ष केले जाते. मात्र, जिल्हा प्रशासनाने यावेळी पुणे पोलीस आयुक्तालय व ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या सहकायार्ने पोस्टल मतदान विषयक प्रशिक्षण घेतले आहे. येत्या २६ मार्च रोजी पिंपरी चिंचवड येथील पोलिसांना यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे पोस्टल मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले.निवडणूकीच्या कामासाठी मतदान केंद्रांवर किंवा इतर प्रशासकीय कामांवर असणा-या कर्मचा-यांनाही प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावता येत नाही .परंतु,निवडणूक कार्य प्रमाणपत्र आणि पोस्टल बॅलेट नमुना-१२ या दोन पध्दतीने पोस्टल मतदान करता येणार आहे.निवडणूकीच्या कामासाठी ४० हजाराहून अधिक कर्मचारी नियुक्त केले आहेत.निवडणूक शाखेने या सर्व कर्मचा-यांना प्रशिक्षण कालावधीत दोन्ही अर्जांचे वाटप केले आहे. उमेदवार निश्चित झाल्यावर पोस्टल मतपत्रिका पाठविल्या जाणार आहेत.परिणामी पोस्टल मतदानाचा टक्का वाढणार आहे.