चित्रपटांच्या पोस्टरचा खजिना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:51 AM2017-08-05T03:51:50+5:302017-08-05T03:52:39+5:30
संजोग, रोटी, आलम आरा, रझिया सुलतान यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीने सुवर्णकाळ अनुभवला. या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आणि चित्रसृष्टीला नवे आयाम प्राप्त करून दिले.
पुणे : संजोग, रोटी, आलम आरा, रझिया सुलतान यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीने सुवर्णकाळ अनुभवला. या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आणि चित्रसृष्टीला नवे आयाम प्राप्त करून दिले. या चित्रपटांच्या पोस्टर्सच्या रुपाने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात मोलाची भर पडली आहे. संग्रहालयाला भारतीय चित्रपटांची अडीच हजार पोस्टर प्राप्त झाली आहेत. यामध्ये मुघल-ए-आझम या चित्रपटाच्या ६ शीटच्या दुर्मिळ पोस्टर्सचा समावेश आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आज ५७ वर्षे पूर्ण होत असून, यानिमित्ताने चित्रपटांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
संग्रहालयाला भारतीय चित्रपटांची अडीच हजार पोस्टर मिळाली आहेत. दीड हजार हिंदी चित्रपटांचे पोस्टर व उर्वरित पोस्टर ही तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम या भाषेतील चित्रपटांची आहेत. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ही पोस्टर तयार करण्यात आली होती. संग्रहामध्ये ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ९० चित्रपटांच्या पोस्टरचा समावेश आहे. ५ आॅगस्ट १९६० रोजी प्रदर्शित झालेल्या मुघल-ए-आझमच्या पोस्टरचा आकार १० फूट बाय ५ फूट एवढा आहे.
भारतीय चित्रपटांच्या इतिहासाच्या दृष्टीने हा ठेवा महत्त्वाचा आहे. चित्रपट संग्रहालय हा ठेवा जपून ठेवणार आहे, जेणेकरून पुढील काळात हा ठेवा देशाच्या चित्रपट संस्कृतीची साक्ष देईल. चित्रपट कलाकार, दिग्दर्शक; तसेच रसिकांकडे चित्रपटासंबंधीचे साहित्य, फिल्म असेल, तर ते त्यांनी संग्रहालयाकडे जतन करण्यासाठी द्यावे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली.
संपूर्ण रामायण (१९६१), श्री गणेश (१९६२), वीर अभिमन्यू (१९६५), शंकर सती अनुसया (१९६५), वीर भीमसेन (१९६४), लक्ष्मी नारायण (१९५१), बलराम श्रीकृष्ण (१९६८) या पौराणिक चित्रपटांची पोस्टरही उपलब्ध झाली आहेत.