मेडिकलच्या पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:11 AM2021-05-12T04:11:05+5:302021-05-12T04:11:05+5:30
पुणे : राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी २०२१ पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा ...
पुणे : राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी २०२१ पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. या परीक्षा येत्या २४ जूनपासून सुरू होणार होत्या. परंतु आता या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे परिपत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी प्रसिद्ध केले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा प्रशासकीय कारणामुळे पुढे ढकलण्यात येत असल्याचे या परिपत्रकात नमूद केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भातील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा २५ मे पासून सुरू होणार होत्या. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या स्थितीमुळे येत्या २४ जूनपासून सुरू होतील, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. आता पुन्हा त्या अनिश्चितकाळासाठी पुढे ढकलण्यात आल्या असून यासंबंधीचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.