दररोज करावे लागतेय ५० ते ६० मृतदेहांचे ‘पोस्टमार्टेम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:11 AM2021-04-18T04:11:18+5:302021-04-18T04:11:18+5:30
पुणे : ससून रुग्णालयातील शवागारामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून दिवसाकाठी ५० ते ६० मृतदेहांचे शवविच्छेदन करावे ...
पुणे : ससून रुग्णालयातील शवागारामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून दिवसाकाठी ५० ते ६० मृतदेहांचे शवविच्छेदन करावे लागत आहे. उपलब्ध मनुष्यबळातच काम करावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांना दहा ते बारा तास ''ड्युटी'' करावी लागत आहे. शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात देण्यास वेळ लागत असल्याने बाहेर रुग्णवाहिकांची रांग लागत असून नातेवाईकही ताटकळत बसलेले चित्र शवागाराबाहेर पाहायला मिळत आहे.
शहरातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढला आहे. ससून रुग्णालयातील कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर हे मृतदेह शवागारात ठेवले जातात. यासोबतच पालिकेच्या अथवा खासगी रुग्णालयांमध्ये नेट असतानाच वाटेत मृत्यू झालेल्या रूग्णांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाते. तसा शासनाचा आदेश आहे. या मृतदेहांची मृत्यूपश्चात ''रॅपिड अँटिजेन'' चाचणी केली जाते. या मृतदेहांबाबत पालिकेसोबत समन्वय साधून काम करण्यात येत असल्याचे येथील डॉक्टर अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतदेह वेळेत देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
----
कोरोना मृतदेहांसोबतच अपघात, आत्महत्या, खून आदी गुन्ह्यांमधील मृतदेह सुद्धा शवविच्छेदनासाठी येत आहेत. त्याचाही अतिरिक्त ताण आहे.
----
अनेकदा नातेवाईकांना फोन करूनही नातेवाईक मृतदेह नेण्यास येत नाहीत. ससूनचे मेडिकल ऑफिसर, पालिकेचे अधिकारी आणि शवागारामधूनही फोन केला जातो. परंतु, नातेवाईक अनेकदा प्रतिसादच देत नाहीत. नातेवाईकांशी संपर्क झाल्यावर पुढील प्रक्रिया सुरू होते. मृतदेह अंत्यविधीला पाठविण्याआधी नातेवाईकांकडून अंडरटेकिंग घेतले जाते. जेणेकरून नंतर कोणत्याही कायदेशीर बाबी उत्पन्न होऊ नयेत.
-----
मृतदेहांना पारदर्शक बॅगेत ठेवले जाते. जेणेकरून नातेवाईकांना किमान शेवटच्या क्षणी चेहरा पाहता येईल.
----
अनेकदा नातेवाईकांनी चुकीचे नंबर दिलेले असल्याने संपर्क करण्यात अडचणी येतात. अशावेळी पोलिसांशी संपर्क साधून माहिती कळविण्यात येते.
----
शवागरातील उपलब्ध मनुष्यबळ
वैद्यकीय शिक्षक : ६
निवासी डॉक्टर : १०
वर्ग तीन (टेक्निशियन) : ६
वर्ग चार कर्मचारी : १२
----