पुढे ढकलणारी परीक्षा आणि जीवघेणी स्पर्धा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:09 AM2021-04-15T04:09:26+5:302021-04-15T04:09:26+5:30

खरे पाहिले तर दोन्ही ही गटांच्या भावना योग्य होत्या कारण एकीकडे वाढते कोरोनाचे संकट, कोरोनाने बाधित विद्यार्थी, आणि त्यातच ...

Postponed exams and life threatening competitions ... | पुढे ढकलणारी परीक्षा आणि जीवघेणी स्पर्धा...

पुढे ढकलणारी परीक्षा आणि जीवघेणी स्पर्धा...

Next

खरे पाहिले तर दोन्ही ही गटांच्या भावना योग्य होत्या कारण एकीकडे वाढते कोरोनाचे संकट, कोरोनाने बाधित विद्यार्थी, आणि त्यातच दोन स्पर्धा परीक्षार्थींचे कोरोनामुळे गेलेले बळी,यामुळे भयभीत झालेले विद्यार्थी सर सलामत तो पगडी पचास म्हणत परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करत होते; तर दुसरीकडे पाच-सहा वर्षांपासून अभ्यास करणारे ग्रामीण विशेषता दुष्काळी भागातील विद्यार्थी कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक परिस्थितीने डबघाईला आलेले होते.

पुण्यासारख्या इतर शहरांमध्ये एक महिना काढणे, या विद्यार्थ्यांना खूप कठीण जात होते. त्यासोबतच वाढत चाललेले वय, वाया जाणारे उमेदीची वर्षे, मानसिक तणाव, कोरोनाच्या सावट आणि या सावटाखाली किती दिवस जायचे, असा प्रश्न करणारे विद्यार्थी होते.

खरेतर परीक्षा पुढे ढकलणे, विद्यार्थी रस्त्यावर उतरणे हे नवे नव्हतेच. २०१४ पासून एमपीएससीला ग्रहण लागले होते. तेव्हापासूनच परीक्षाही अनियमित झाल्या होत्या, पुढे जाऊ लागल्या, आंदोलने सुरू झाली, परीक्षा ऑनलाईन घेण्याचा घाट घातला गेला, त्यातून कित्येक घोटाळे झाल्याचे निष्पन्न झाले, प्रत्येक परीक्षा कोर्टाची पायरी चढू लागली, अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या रखडल्या, आरक्षणाचा प्रश्‍न उद्भवला आणि आता तर एमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप डोके वर काढू लागला ते वेगळेच. या सर्वाला जबाबदार ठरली ती राजकीय मानसिकता. हे सर्व होत असताना मात्र, विद्यार्थ्यांनी एक वास्तव समजून घेणे गरजेचे आहे.

पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ११ मार्च रोजी आंदोलने झाली. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. परंतु, लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत, त्यामध्ये राज्यसेवा परीक्षा २०० पदांसाठी झाली आणि अर्ज केलेले विद्यार्थी २ लाख ६२ हजार एमपीएससीकडे २३ लाख विद्यार्थ्यांचे प्रोफाइल आहेत. त्यामुळे सरकारने जरी सर्व रिक्त जागा भरल्या तरी प्रत्येकाला नोकरी लागणे अशक्य आहे आणि हेच वास्तव आहे. याचा अर्थ प्रयत्नच करू नयेत अथवा अभ्यास बंद करावा किंवा या क्षेत्रात येऊ नये असे नक्कीच नाही. परंतु, या क्षेत्रात येताना आपण का? जात आहोत? आपण किती वर्षे या क्षेत्रात स्वतःला अजमावण्यासाठी द्यावेत? यश नाहीच मिळाले तर आपला काही प्लॅन बी तयार आहे का? या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.

कारण एमपीएससीचे हे मृगजळ अशा चक्रव्यूहामध्ये घेऊन जाते की, एक तर तेथून बाहेर निघण्यासाठी वाटा खूपच कमी आहेत आणि काहींना वाटा दिसूनही बाहेर पडता येत नाही. कारण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. कित्येक विद्यार्थी पाच-दहा वर्षांपासून अभ्यास करत आहेत. त्यांनीही अजून उमेदीचे किती वर्षे वाया घालवायचे हे ठरवायला हवे. वेळीच आपली कुवत ओळखून या मृगजळातून बाहेर पडणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा हे अधिकारी बनण्याचे एकमेव साधन नाही. कारण प्रत्येक क्षेत्रातील काम करणारा व्यक्ती हा त्या क्षेत्रातील अधिकारीच असतो. जोपर्यंत शेतकरी, पत्रकार, व्यवसायिक, खेळाडू, यांसारखे इतर क्षेत्रातील लोक स्वतःला ‘मी अधिकारी’ संबोधत नाहीत. तोपर्यंत हे बदलणे कठीणच. कटू आहे, परंतु हे वास्तव आहे.

- किरण निंभोरे, एमपीएससी स्टुडंस् राईट

Web Title: Postponed exams and life threatening competitions ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.