२४ तास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव पुढे ढकलला
By admin | Published: January 28, 2016 03:12 AM2016-01-28T03:12:22+5:302016-01-28T03:12:22+5:30
शहराला येत्या ५ वर्षांत २४ तास एकसमान पाणीपुरवठा करण्याचा आयुक्त कुणाल कुमार यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीने एक आठवडा पुढे ढकलण्याचा
पुणे : शहराला येत्या ५ वर्षांत २४ तास एकसमान पाणीपुरवठा करण्याचा आयुक्त कुणाल कुमार यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीने एक आठवडा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत २४ तास पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या अहवालांची एकत्रित माहिती सादर करण्यास स्थायी समितीकडून सांगण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी २८०० कोटी रुपये खर्च करून संपूर्ण शहराला २४ तास एकसमान पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यासाठी पाणीपटट्ीमध्ये वाढ करण्यास सांगितले आहे. बुधवारी हा विषय स्थायी समितीसमोर चर्चेला आला तेव्हा या विषयाचा अभ्यास करावयाचा असल्याने तो एक आठवडा पुढे ढकलण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सदस्यांकडून घेण्यात आला, अशी माहिती स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी दिली.
आयुक्तांनी स्थायी समितीसमोर सादर केलेल्या प्रस्तावामध्ये पाणीपटट्ीमध्ये ५० टक्के दरवाढ करण्याची सूचना केली आहे; तर अंदाजपत्रकामध्ये २२.५ टक्के दरवाढ सुचविण्यात आली आहे. यामुळेही संभ्रम निर्माण झाला आहे. आतापर्यंत २४ तास पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाकडून अनेक वेळा प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत, त्याचे पुढे काय झाले, याची विचारणा स्थायी समितीच्या सदस्यांकडून करण्यात आली आहे.