भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावाला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:47+5:302021-06-11T04:08:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर : खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकरांवरील अविश्वास ठरावाला उच्च न्यायालयाची स्थगिती मिळाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकरांवरील अविश्वास ठरावाला उच्च न्यायालयाची स्थगिती मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. सी. गुप्ते आणि एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने या ठरावाला गुरुवारी (दि १०) स्थगिती दिली, अशी माहिती याचिकाकर्ते खेड पंचायत समितीचे काँग्रेसचे माजी उपसभापती, विद्यमान सदस्य अमोल पवार यांनी दिली.
शिवसेनेचे खेड पंचायत समितीचे सभापती पोखरकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ११ विरुद्ध ३ मतांनी मंजूर झाल्याचे ३१ मे रोजी खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी घोषित केले होते. त्या निर्णयाला आव्हान देत सभापती पोखरकर, पंचायत समिती सदस्य कॉंग्रेसचे अमोल पवार व शिवसेनेच्या ज्योती अरगडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने अविश्वास ठराव मंजुरीला स्थगिती दिली व पुढील सुनावणी २६ जून रोजी होणार असल्याचे सांगितले. खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात संमत झालेल्या अविश्वास ठरावावर मतदान होताना पोखरकर यांच्या समर्थक दोन सदस्यांना सभागृहात जबरदस्तीने हात वर करायला सांगण्यात आल्याच्या मुद्यावर न्यायालयाने ही स्थगिती दिली आहे. याबाबतचे सभागृहातील व्हिडीओ चित्रकरण न्यायालयात सादर करण्यात आले होते. खेड पंचायत समितीमध्ये सेना, भाजप व काँग्रेसचे मिळून १४ पैकी १० सदस्यांचे बहुमत आहे. शिवसेना व सहकारी पक्ष्याच्या सदस्यांमध्ये आपसांत ठरल्यानुसार राजीनामा दिला नाही. म्हणून सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या ६ सदस्यांनी बंड करून त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला. त्यावर चर्चा होऊन मतदान घेण्यात आले. त्यात सेनेचे ६, भाजपचे उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आशा ११ जणांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले होते. भगवान पोखरकर यांच्या बाजूने ३ मते पडली होती. तत्पूर्वी ठराव मांडला म्हणून सभापती पोखरकर यांनी विरोधातील सदस्य एकत्रित पणे सहलीला गेल्यावर ते मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन मारहाण केली. तसेच यावेळी गोळीबार, विनयभंग केल्याचा आरोप झाला होता. त्यावरून पोखरकर व अन्य २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली आहे. या प्रकरावरून तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
चौकट
पुढील सुनावणी २६ जूनला असून त्यावेळी होणाऱ्या निर्णयावर राजकीय समीकरणे रंगतील. सदस्यांवर झालेल्या हल्ल्यात आढळराव पाटील हे सूत्रधार असून त्यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मोहिते पाटील यांनी केली होती. तर, शिवसेनेच्या सदस्यांवर राष्ट्रवादीचे आमदार मोहिते पाटील यांनी दबाव आणून हे प्रकरण घडविले असा आरोप सुरुवातीला आढळराव पाटील व नंतर खासदार संजय राऊत यांनी केला होता. अविश्वास ठरावानंतर नवीन सभापती निवडीसाठी कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच अविश्वास ठराव मंजुरीला स्थगिती मिळाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सभापती यांच्या विरोधात मतदान केलेले पंचायत समिती सदस्य, नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच सहलीला गेलेले आहेत. या स्थगितीच्या निर्णयामुळे आता त्यांचा मुक्काम वाढणार की ते सहलीवरून परत येणार, याबाबतही लोकांना उत्सुकता आहे.