Maharashtra: अधिछात्रवृत्ती सीईटी उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनास स्थगिती
By प्रशांत बिडवे | Published: January 11, 2024 05:28 PM2024-01-11T17:28:34+5:302024-01-11T17:29:26+5:30
विद्यार्थ्यांकडून हाेणारा विराेध पाहता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करण्यास स्थगिती दिली आहे...
पुणे : सारथी, बार्टी, महाज्योती यांच्यातर्फे पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्तीसाठी बुधवारी संयुक्त चाळणी परीक्षेचे आयाेजन केले हाेते. परीक्षेदरम्यान सील नसलेल्या प्रश्नपत्रिका संच वितरित केल्याने पुण्यासह राज्यातील इतर परीक्षा केंद्रावर गाेंधळ उडाला हाेता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकत प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या सेट भवनासह सारथी आणि बार्टी कार्यालयासमाेर जाेरदार आंदाेलन केले हाेते. विद्यार्थ्यांकडून हाेणारा विराेध पाहता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करण्यास स्थगिती दिली आहे.
राज्यातील पुण्यासह कोल्हापूर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांतील परीक्षा केंद्रांमार्फत संयुक्त चाळणी परीक्षेचे आयाेजन केले हाेते. परीक्षेसाठी ए, बी, सी व डी अशा चार प्रश्नपत्रिका संचांची छपाई केली होती. प्रश्नपत्रिका संच सी आणि डी मधील विद्याथ्यांसाठी महत्त्वाच्या सूचनेमधील सूचना क्र.३(i) मध्ये प्रश्नपत्रिका उघडण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर लावलेले सील उघडावे, सील नसलेली किंवा सील उघडलेली प्रश्नपत्रिका स्वीकारु नये, असे नमूद केले होते. मात्र, ए आणि बी प्रश्नपत्रिका संचास सील होते, परंतु सी आणि डी प्रश्नपत्रिका संचांना सील नव्हते. सीलबंद प्रश्नपत्रिका न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकत आंदाेलन केले हाेते.
प्रा. कापडणीसांवर कारवाई केव्हा?
संशाेधकांना अधिछात्रवृत्ती देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सेट विभागाकडे साेपविलेआहे. यापूर्वी दि. २४ डिसेंबर राेजी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका ही २०१९ च्या सेट परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील काॅपी असल्याचे उघडकीस आले हाेते. त्यामुळे ती परीक्षा स्थगित करीत पुन्हा १० जानेवारी राेजी परीक्षा घेण्यात आली त्यातही प्रश्नपत्रिकांना सील नव्हते तसेच प्रश्नपत्रिका ए संचातील काही प्रश्नांचे मराठी आणि इंग्रजीतील भाषांतर चुकीचे छापण्यात आले हाेते. या दाेन्ही परीक्षेत सेट विभागाच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. संशाेधकांसाठी ही अत्यंत महत्वाची परीक्षा असून हलगर्जीपणा करणाऱ्या समन्वयक प्रा. कापडणीस यांच्यावर विद्यापीठ प्रशासन कारवाई केव्हा करणार? अशी विचारणा संशाेधक विद्यार्थ्यांकडून हाेत आहे.
प्रश्नपत्रिकांची पाकिटे सीलबंद हाेते -
पेपर फुटीसंदर्भात केलेले आरोपात तथ्य नाही. सी आणि डी संचामधील प्रत्येक प्रश्नपत्रिका संचास सील नसले तरी प्रश्नपत्रिका संच असलेल्या पाकिटांना सील होते आणि ते परीक्षा केंद्रांवरच उघडण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करता विद्यापीठाच्या वतीने परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन स्थगित केले आहे.
- प्रा. डाॅ.बी.पी. कापडणीस, समन्वयक, सेट विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ