सातगाव पठार भागात पावसाअभावी बटाट पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:13 AM2021-08-14T04:13:53+5:302021-08-14T04:13:53+5:30

मंचर : बटाटा पिकाचे आगार समजल्या जाणाऱ्या सातगाव पठार भागात बटाटा पीक फुलोऱ्यात आले आहे. मागील पंधरा दिवसांपासून पावसाने ...

Potato crop in danger due to lack of rainfall in Satgaon plateau area | सातगाव पठार भागात पावसाअभावी बटाट पीक धोक्यात

सातगाव पठार भागात पावसाअभावी बटाट पीक धोक्यात

Next

मंचर : बटाटा पिकाचे आगार समजल्या जाणाऱ्या सातगाव पठार भागात बटाटा पीक फुलोऱ्यात आले आहे. मागील पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून बटाटा पिकासाठी पावसाची नितांत आवश्यकता आहे. येत्या आठ दिवसांत पाऊस पडला नाही तर बटाटा पीक धोक्यात येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव, पेठ, पारगावतर्फे खेड या सात गावात दरवर्षी सुमारे दहा हजार एकर क्षेत्रावर बटाटा लागवड केली जाते. मागील वर्षी बटाटा पिकाने शेतकऱ्यांना चांगलाच फटका दिला. निसर्गाची अवकृपा तसेच कमी बाजारभाव यामुळे बहुतेक शेतकऱ्यांचे भांडवल वसूल झाले नाही. शेतकरी कर्ज काढून भांडवल उपलब्ध करत बटाटा पीक घेतो. मात्र मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना फटका बसून भांडवल अंगावर आले. त्याचा परिणाम या वर्षीच्या बटाटा लागवडीवर झाला आहे. मागील वर्षीचा तोटा यामुळे यावर्षी बटाटा लागवड कमी झाल्याची माहिती भावडी येथील अशोक बाजारे यांनी दिली. कोरोनाचा फटकासुद्धा बसला आहे. येथील शेतकरी कमी भांडवल असलेल्या पिकांकडे यावर्षी वळाला आहे. सातगाव पठार भागात यावर्षी केवळ पाच हजार एकर क्षेत्रावर बटाटा लागवड झाल्याचा अंदाज आहे. त्यासाठी तीन हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल या बाजारभावाने बियाणे आणले आहे. कमी भांडवल असणाऱ्या पिकांकडे शेतकरी वळला आहे. यावर्षी प्रथमच सोयाबीन, वाटाणा, फरशी, बीट, भुईमूग, मेथी, कोथिंबीर या पिकांची लागवड क्षेत्र वाढल्याची माहिती कोल्हारवाडी येथील जयसिंग एरंडे यांनी दिली. बटाटा पिकाला एकरी साठ हजार रुपये भांडवली खर्च येतो. अनेक शेतकऱ्यांनी धाडसाने बटाटा लागवड केली आहे. सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली. त्यानंतर पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. दुबार बटाटा लागवडीचे संकट उभे राहिले होते. मात्र मध्यंतरी पावसाने दमदार हजेरी लावल्याने बटाटा पीक जोमदार आले आहे. सध्या बटाटा पीक फुलोऱ्यात आले आहे. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने पुन्हा एकदा बटाटा पिकाला फटका बसणार आहे. सध्या या पिकासाठी पावसाची नितांत आवश्यकता आहे. दिवसभर कडक ऊन पडलेले असते. त्यामुळे जमिनीतील ओल कमी झाली आहे. शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. येत्या आठ दिवसांत पाऊस पडला नाही तर बटाटा पिकाला फटका बसणार आहे. दरम्यान, बटाटा पिकाचा राष्ट्रीय पीक विमा योजनेत समावेश करावा अशी मागणी हुंडेकरी व्यावसायिक राम तोडकर, अशोकराव बाजारे यांनी केली आहे.

१३ मंचर बटाटा

सातगाव पठार भागात बटाटा पीक फुलोऱ्यात आले आहे.

Web Title: Potato crop in danger due to lack of rainfall in Satgaon plateau area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.