रब्बीतील बटाटा वाण सडले, बाजारभाव कमी , आतापर्यंत केवळ ५८ ट्रक वाणाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 01:59 AM2017-09-14T01:59:56+5:302017-09-14T02:00:15+5:30
रब्बी हंगामातील बटाटा वाणाला अजिबात मागणी नाही. बटाटा वाणाचे बाजारभाव कमी असूनही शेतकरी बटाटा वाण लागवडीसाठी नेत नाहीत. यावर्षी केवळ २५ ते ३० टक्के क्षेत्रात बटाटा लागवड होणार आहे. विक्रीअभावी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बटाटा वाण सडू लागले आहे.
मंचर : रब्बी हंगामातील बटाटा वाणाला अजिबात मागणी नाही. बटाटा वाणाचे बाजारभाव कमी असूनही शेतकरी बटाटा वाण लागवडीसाठी नेत नाहीत. यावर्षी केवळ २५ ते ३० टक्के क्षेत्रात बटाटा लागवड होणार आहे. विक्रीअभावी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बटाटा वाण सडू लागले आहे.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती बटाटा वाणासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. रब्बी व खरीप या दोन्ही हंगामात बटाटा वाण विक्रीसाठी उपलब्ध असते. नोटाबंदीनंतर त्याचा परिणाम बटाटा वाणाच्या खरेदीवर झाला होता. त्याचा परिणाम होऊन खरीप हंगाम वाया गेला. जून व जुलै या दोन महिन्यांत केवळ १०४ ट्रक बटाटा वाणाची विक्री झाली. या वेळी क्विंटलला ५०० ते १००० रुपये बाजारभाव होता. रब्बी हंगामात बटाटा वाणाची आतापर्यंत केवळ ५८ ट्रक विक्री झाली आहे. मागील वर्षी या वेळेपर्यंत सव्वाशे ट्रक वाणाची विक्री झाली होती.
यावर्षी केवळ २५ ते ३० टक्के बटाटा वाणाची विक्री होऊन लागवड होईल, असे व्यापारी संजय मोरे यांनी सांगितले. बटाटा वाणाला मागणी कमी होण्याची अनेक कारणे आहेत. गेली तीन वर्षांपासून उत्पादित बटाटा पिकाला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. शेतकºयांचे भांडवल अंगावर येत आहे. उसाला चांगला भाव मिळत असल्याने अनेक शेतकºयांनी बटाटा पिक घेण्याऐवजी उसाचे पिक घेण्यास प्राधान्य दिले आहे. नोटाबंदी बरोबरच सतत पडणारा पाऊस हेसुद्धा बटाटा लागवड कमी होण्याचे कारण असून शेतकरी बटाटा लागवड करू इच्छित नाही.
पंजाब राज्यातून बटाटा वाण विक्रीसाठी येतो. बटाटा वाणाला मागणी नसल्याने पंजाब राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या मंचर बाजार समितीत ४० ट्रक बटाटा वाणाची आवक झाली आहे. मात्र त्याला मागणी नाही.
बटाटा वाणाला बाजारभाव कमी आहे. सध्या क्विंटलला ८०० ते ११०० रुपये असा बाजारभाव आहे. मागील वर्षी हाच भाव २७०० रुपये होता. सध्या बटाटा वाण केवळ ठराविक स्थानिक शेतकरी खरेदी करतात. आॅक्टोबर महिन्यात सातारा, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, उस्मानाबाद, औरंगाबाद येथील शेतकरी बटाटा वाण खरेदीसाठी येत असतात. ते आले तर थोडीफार बटाटा वाणाची विक्री होईल, अन्यथा बटाटा सीझन वाया जाणार आहे.