खड्ड्यांना आता अधिकारी जबाबदार?
By admin | Published: July 31, 2014 02:11 AM2014-07-31T02:11:22+5:302014-07-31T02:11:22+5:30
महापालिकेच्या रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही मुदतीपूर्वी रस्ते खराब होऊन खड्डे कसे काय पडतात, असा सवाल करीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले
पुणे : महापालिकेच्या रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही मुदतीपूर्वी रस्ते खराब होऊन खड्डे कसे काय पडतात, असा सवाल करीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. खराब रस्ते व खड्ड्यांसाठी केवळ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून चालणार नाही. त्याची जबाबदारी संबंधित अधिकारी व अभियंत्यावर टाकून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आज करण्यात आली.
पावसाळ्यात खड्डे वाढत चालले आहेत. त्याचबरोबर डेंगीचा प्रसार होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष व खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त विकास देशमुख यांची आज भेट घेतली. त्या वेळी महापौर चंचला कोद्रे, सभागृह नेते सुभाष जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष विनायक हनमघर, दत्तात्रय धनकवडे, महेंद्र पठारे आदी उपस्थित होते. त्यानंतर बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती अॅड. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दर वर्षी पावसाळा पूर्व कामांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. त्यानंतरही निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावर खड्डे पडतात. त्यासाठी केवळ ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येते. मात्र, अधिकाऱ्यांवर काही कारवाई होत नाही. यापुढे रस्त्याची निकृष्ट कामे व खड्ड्यांसाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे. रस्त्याच्या कामांच्या तक्रारीसाठी अधिकाऱ्यांचे फलक लावावेत. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करावी, अशी मागणी
चव्हाण यांनी केली. तसेच, खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आयुक्त देशमुख यांच्याकडे करण्यात आली.(प्रतिनिधी)