जनतेचा राग मतपेटीतून दिसला तरच रस्त्यांवरील खड्डे संपतील- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 02:49 PM2023-08-18T14:49:28+5:302023-08-18T14:52:17+5:30
जोपर्यंत लोकांच्या मनातील राग मतपेटीतून दिसणार नाही तोपर्यंत खड्डे पडणं बंद होणार नाही....
पुणे : शहरात खड्डे पहिल्यांदा पडलेले नाहीत. गेल्या कित्येक वर्षांपासून पुणे शहरात खड्डे आहेत. पण कुणाला याचे काही पडले नाही. मला वाटते की तुम्ही ज्या लोकांना निवडून देत आहात त्यावर विचार करणे गरजेचे आहे. जनतेचेही आश्चर्य वाटते, ही लोकं काम करत नाहीत तरीही तुम्ही त्यांना कसे निवडून देता, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. ते आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते म्हणाले, जोपर्यंत लोकांच्या मनातील राग मतपेटीतून दिसणार नाही तोपर्यंत खड्डे पडणं बंद होणार नाही.
पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यात कायदा नावाची गोष्ट राहिलेलं नाही. राज्यकर्त्यांच्या मनाला वाटेल तेंव्हा ते निवडणुका घेतील. पुणे कुठून कसं पसरतेय याची कुणाला कल्पनाच नाही. फक्त मतदार वाढण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहराला टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्ट असते हे कुणाला माहितीच नाही.
खड्ड्यांविरोधात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी तोडफोड करायची असे नाही. त्या-त्या ठिकाणी त्यात त्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे. आज पुणे प्रचंड वाढत चाललंय. पण प्रशासन याकडे लक्ष देत नाही, असं ठाकरे म्हणाले.