बटाट्याची झाली माती!, अतिपावसाने सडला : उर्वरित मालालाही भाव नाही; उत्पादक चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 04:45 AM2017-09-25T04:45:10+5:302017-09-25T04:45:20+5:30
बटाटा उत्पादक शेतक-यांची यंदाची दिवाळी कडू होणार आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने बटाटा शेतातच सडला, तर ऐरणीत ठेवलेल्या मालाचेही नुकसान झाले
पेठ : बटाटा उत्पादक शेतक-यांची यंदाची दिवाळी कडू होणार आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने बटाटा शेतातच सडला, तर ऐरणीत ठेवलेल्या मालाचेही नुकसान झाले; तसेच आता राहिलेल्या मालालाही चांगला भाव नसल्यामुळे उत्पादक चिंतेत आहे. आंबेगाव तालुक्यातील बटाटा पिकाचे आगार समजल्या जाणा-या सातगाव पठार भागातील शेतकºयांना याचा मोठा फटका बसला आहे.
पेठ, कुरवंडी, कारेगाव, थुगाव, भावडी, कोल्हारवाडी व पारगाव तर्फे खेड परिसरात झालेला पाऊस बटाटा पिकाला मारक ठरला आहे. ४० ते ५० टक्के पीक सडले आहे. उर्वरित शिल्लक असलेल्या बटाट्याला अपेक्षित बाजारभाव नाही. त्यामुळे या भागातील सुमारे १ हजार ५०० शेतकºयांचे ऐन दिवाळीच्या तोंडावर दिवाळ निघाले आहे.
या वर्षी जून महिन्यात बटाटा लागवडीसाठी शेतकºयांनी शेत मशागतीची कामे पूर्ण केली होती. वेळेवर पाऊस सुरू झाल्यामुळे दुसºया आठवड्यापासून या भागात बटाटा लागवडीची लगबग सुरू आहे. विशेष म्हणजे, या भागातील शेतीसाठी जलसिंचनाची कोणतीही सोय नाही. पडणा-या पावसावरच येथील शेती व बटाटा पीक अवलंबून आहे. पाच पोत्यांपासून ५०० पोत्यांपर्यंत बटाटा लागवड करणारे शेतकरी या भागात आहेत.
गेल्या दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेता शेतकºयांनी यंदा ६० टक्केच बटाटा लागवड केली होती. त्यामुळे लागवड कमी झाल्याने बाजारभावात अपेक्षित वाढ होईल, ही अपेक्षादेखील आता फोल ठरत चालली आहे.
पावसाचा सर्वाधिक फटका पारगाव तर्फे खेड व कुरवंडी भागाला बसला. त्या खालोखाल पेठ, थुगाव, भावडी या गावांतील देखील बहुतांशी बटाटा पीक सडले आहे. चालू हंगामात बटाटा पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.
चालू वर्षात बटाट्याचे बाजारभाव वाढतील या आशेने अनेक शेतकºयांनी बटाटा पीक काढल्यावर अरणीमध्ये साठविले होते. परंतु, सतत पडणाºया पावसामुळे बटाटे सडले आहेत. अरणीतील निम्मे बटाटे फेकून देण्याचीवेळ शेतकºयांवर आली आहे.