कोरोनाच्या अफवेमुळे कुक्कटपालन व्यवसाय अडचणीत ; सायबर सेलकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 06:22 PM2020-02-20T18:22:30+5:302020-02-20T18:59:41+5:30
मागील १५ दिवसात बॉयलर कोंबडीच्या विक्रीत तिपटीहून अधिक घट झाली आहे. महाराष्ट्रातही मागील दहा दिवसांत ११०० मेट्रीक टनाने विक्रीत घट झाल्याने या व्यवसायाला दि. ४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत सुमारे १५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
पुणे : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावासंदर्भात पसरलेल्या अफवेमुळे कुक्कटपालन व्यवसाय संकटात सापडला आहे. मागील १५ दिवसात बॉयलर कोंबडीच्या विक्रीत तिपटीहून अधिक घट झाली आहे. महाराष्ट्रातही मागील दहा दिवसांत ११०० मेट्रीक टनाने विक्रीत घट झाल्याने या व्यवसायाला दि. ४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत सुमारे १५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. दरम्यान, ही अफवा पसरविणाऱ्यांविरूध्द पशुसंवर्धन विभागाने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.
चीनमध्ये कोरोना विषाणुचा फैलाव वेगाने होत आहे. भारतामध्ये कोंबडीच्या माध्यमातून या विषाणुचा फैलाव होत असल्याची अफवा सोशल मिडियातून पसरली. त्याचा फटका थेट या व्यवसायाला बसला आहे. यापार्श्वभुमीवर पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी ससून रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, राष्ट्रीय विषाणु संस्थे (एनआयव्ही) तील शास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. तांदळे, वेंकीजचे महाव्यवस्थापक डॉ. प्रसन्न पेडगांवकर, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे उपस्थित होते. ‘कोंबडीद्वारे कोरोना विषाणुचा प्रसार होत असल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. यांसदर्भात सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे. अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेऊन पोलिस कारवाई करतील. अफवेमुळे कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. त्यामुळे या अफवेवर विश्वास ठेवू नये,’ असे आवाहन सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले.
पेडगावकर यांनी राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायावर झालेल्या परिणामांची माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात दररोज २८०० मेट्रिक टन ब्रायलर कोंबडीची मागणी असते. दि. ४ फेब्रुवारीनंतर ही मागणी १७०० मेट्रीक टनांपर्यंत खाली आली होती. आता काही प्रमाणात जनजागृती होऊ लागल्याने हा आकडा २२०० मेट्रीक टनांपर्यंत वाढला आहे. पण या अफवेमुळे दि. ४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत प्रति दिन १० कोटी याप्रमाणे १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच या व्यवसायावर मका व सोयाबीन पिकविणाऱ्या शेतक ऱ्यांनाही फटका बसला आहे. देशातील कुक्कुटपालन व्यवसायाची एकुण उलाढाल १ लाख २० कोटी रुपयांची आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा १२ टक्के एवढा आहे. देशामध्ये ५० लाख शेतकीर हे मका व ५५ लाख शेतकरी सोयाबीन पिकविणारे आहेत. त्यांनाही या अफवेचा फटका बसला आहे.