वीज वितरण कंपनीने घेतली कामगारांची काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:10 AM2021-05-01T04:10:21+5:302021-05-01T04:10:21+5:30
पुणे : कोरोना आपत्तीकाळातही जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आपल्या लाखभर कामगारांची वीज वितरण कंपनीने विमा कवच देऊन काळजी ...
पुणे : कोरोना आपत्तीकाळातही जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आपल्या लाखभर कामगारांची वीज वितरण कंपनीने विमा कवच देऊन काळजी घेतली आहे. यात ३२ हजार कंत्राटी कामगारांचाही समावेश करण्यात आला आहे.
महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील लाईन हेल्पर, सबस्टेशन ऑपरेटर, सुरक्षा रक्षक, यासह विविध रिक्त पदांच्या जागेवरील कामगार फ्रंटलाईन वर्कर म्हणून जीव धोक्यात घालून महाराष्ट्रातील जनतेला कोरोना काळात अखंडित व सुरळीत वीज सेवा देत आहेत.
कामावर असताना या कामगारांचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांना कंपनीने ३० लाख रुपयांचे विमा कवच दिले आहे. यात ३२ हजार कंत्राटी कामगारांचाही समावेश केला म्हणून भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट कंत्राटी वीज कामगार संघाने कंपनीचे आभार मानले आहेत.
याशिवाय कंपनीने कोरोना लसीकरणासाठीही कंत्राटी कामगारांना प्राधान्य दिले, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली. तसेच कर्तव्य बजावत असताना. कोरोना बाधीत झाल्यास उपचारासाठी कालावधी रजा न धरता कामावर आहे असे गृहीत धरले जाणार असल्याचेही तिन्ही कंपन्यांनी जाहीर केले.
कोरोना काळात कामगारांना वैद्यकीय सुविधा मिळविण्यात मदत व्हावी यासाठी कंपनीनिहाय ठराविक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कामगारांंनी त्यांच्याशी त्यांच्याशी संपर्क करावा. नियमांचे पालन करत सुरक्षितपणे काम करावे, लक्षणे दिसल्यास ताबडतोब तपासणी करावी व लवकर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.