संशोधनामध्ये पॉवर आॅफ आयडिया महत्त्वाची : रघुनाथ माशेलकर; पुण्यात सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:54 PM2018-01-17T13:54:27+5:302018-01-17T13:57:55+5:30
कोणतीही गोष्ट घडवण्यासाठी ‘पॉवर आॅफ बजेट’ नव्हे, तर ‘पॉवर आॅफ आयडिया’ सर्वाधिक महत्त्वाची असते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.
पुणे : संशोधनामध्ये निधीची कमतरता जाणवत असल्याबाबत बोलले जाते; मात्र कोणतीही गोष्ट घडवण्यासाठी ‘पॉवर आॅफ बजेट’ नव्हे, तर ‘पॉवर आॅफ आयडिया’ सर्वाधिक महत्त्वाची असते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.
डॉ. माशेलकर यांच्या अमृतमहोत्सवी (७५व्या) वाढदिवसानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आयुका, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस (एनसीसीएस), सेंटर फॉर डेव्हलपमेंट आॅफ अॅडव्हान्स कॉम्प्युटिंग (सी-डॅक), इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेटिआॅरॉलॉजी (आयआयटीएम), आघारकर रीसर्च इन्स्टिट्यूट (एआरआय), सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट), भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) आणि कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) आदी संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. माशेलकर यांचे पीएच.डी.चे मार्गदर्शक डॉ. एम. एम. शर्मा, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम उपस्थित होते.
डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘जीवनातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगी मी केवळ मेंदूचे ऐकले नाही, तर हृदयाचा आवाज ऐकला. त्यामुळे मी तरुणांना आवाहन करतो, की नेहमी हृदयाचा आवाज ऐका. अनेकदा लोक मला विचारतात, तुम्ही इतके महत्त्वाचे निर्णय कसे घेता? यावर मी सांगतो, मैने दिल की आवाज सुनी। हळदीच्या स्वामित्व हक्काचा लढा, पुण्यात ‘आयसर’च्या स्थापनेसाठी शंभर एकर जमीन देण्याचा निर्णय अशा अनेक महत्त्वाच्या निर्णयांच्या वेळी मी असेच निर्णय घेतले. त्याचा मला फायदा झाला आहे. इथे जमलेल्या तरुणांना मी सांगू इच्छितो, की तुम्ही हृदयाचा आवाज ऐका; त्यामुळे निश्चितच फरक पडेल.’’
‘विद्यावाणी’चे संचालक आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. शाळिग्राम यांनी आभार मानले.
माशेलकर यांच्या नावाने फेलोशिप
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘डॉ. माशेलकर पोस्ट डॉक्टरल फेलोशिप फॉर सायन्स’ अशी फेलोशिप सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ. करमळकर यांनी या वेळी जाहीर केले. विद्यापीठाला ‘एमिनन्स’चा दर्जा मिळावा, यासाठी अशा २० फेलोशिप सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल केलेला आहे.
डॉ. माशेलकर यांचे गुरू डॉ. शर्मा यांनी त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘‘माझा विद्यार्थी हा महान शास्त्रज्ञ आहेच; शिवाय त्याने विविध गुणांच्या आधारे आत्ताचे स्थान कमावले आहे. थकवा नावाची गोष्ट त्याच्या व्यक्तिमत्त्वातच नाही. ’’