उद्घाटनाअभावी वीजजोड रखडली
By admin | Published: April 24, 2017 05:01 AM2017-04-24T05:01:59+5:302017-04-24T05:01:59+5:30
भूमिगत तारा व डी. पी. बसवण्याचे काम चार महिन्यांपूर्वी झाले तरी केवळ श्रेय घेण्यासाठी नागरिकांना वीजजोड करू दिली जात नाही.
हडपसर : भूमिगत तारा व डी. पी. बसवण्याचे काम चार महिन्यांपूर्वी झाले तरी केवळ श्रेय घेण्यासाठी नागरिकांना वीजजोड करू दिली जात नाही. ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या निधीतून हे काम केले आहे. स्थानिक आमदारांच्या हस्ते उद्घाटन झाल्याशिवाय काम होऊनही वीज जोडणी केली जात नाही, स्थानिक नगरसेकांनी हे काम रखडवल्याचे असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. केवळ उद्घाटन झाले नाही म्हणून वीजजोड केली जात नसल्याने जनतेस वेठीस धरले जात आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विभास जाधव यांनी केला आहे.
काळेपडळ येथील बोराटेचाळ गल्ली नं. १ ते ६, प्रगतीनगर गल्ली नं. १ ते ५, ओंकार कॉलनी गल्ली नं. २ व ३, बीजलीनगर गल्ली नं. १ ते १४ येथे सध्या वीज आहे, पण ओव्हरहेड केबलचे भूमिगत करण्याचे काम गेल्या वर्षी चालू केले. ते पूर्ण ही झाले आहे. दरम्यानच्या कालावधीत निवडणुकांमध्ये श्रेय मिळावे, म्हणून पावसाचे कारण देऊन काम थांबवण्यात आले. निवडणुकीच्या तोंडावर काम सुरूकेले. ४ महिने झाले काम पूर्ण होऊन, पण वीज कनेक्शन सुरू केले नाही. रस्ता खोदला गेला आहे. रस्त्यात अडथळा होत आहे. अनेक वेळा विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, परंतु विद्युत तारा जोडल्या जात नाहीत, असे जाधव यांनी सांगितले.