सत्ता हे समाज परिवर्तनाचे साधन
By Admin | Published: May 22, 2017 04:54 AM2017-05-22T04:54:08+5:302017-05-22T04:54:08+5:30
भाजपा हा इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळा पक्ष आहे. आपल्या पक्षाला निश्चित वैचारिक बैठक आहे. सत्ता हे समाज परिवर्तनाचे साधन आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : भाजपा हा इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळा पक्ष आहे. आपल्या पक्षाला निश्चित वैचारिक बैठक आहे. सत्ता हे समाज परिवर्तनाचे साधन आहे, विस्तारक योजनेत कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे मत भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत यश मिळविल्यानंतर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी केली आहे. चिंचवड येथे भारतीय जनता पक्षाची राज्यस्तरीय बैठक झाली होती. त्या वेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षविस्तारासाठी विस्तारक योजनेची माहिती दिली होती. तसेच नगरसेवक, पदाधिकारी, आमदार, खासदार यांना विस्तारक होण्यासाठी आवाहन केले होते. भारतीय जनता पक्षाने ज्या ठिकाणी पक्षाची ताकद कमी आहे, तिथे जोर लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी विस्तारक योजनेसंदर्भात माहिती देण्यासाठी आणि आढावा घेण्यासाठी नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. त्यात ते बोलत होते. या वेळी गटनेते एकनाथ पवार, सरचिटणीस प्रमोद निसळ आदी उपस्थित होते.
जगताप म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बैठकीत विस्तारक योजनेविषयी माहिती देण्यात आली होती. भाजपाची जिथे ताकद कमी आहे. त्या ठिकाणी आणि सरकारच्या निर्णयांची माहिती देण्यासाठी पक्षाने पंडित दीनदयाळ उपाध्याय विस्तारक योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत पिंपरी महापालिकेतील भाजपाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक २६ मे ते दहा जून दरम्यान विस्तारक म्हणून कार्य करणार आहेत.’’