पुढाऱ्यांच्या गावातच विरोधकांची सत्ता
By admin | Published: July 17, 2015 03:49 AM2015-07-17T03:49:03+5:302015-07-17T03:49:03+5:30
ग्रामपंचायत निवडणूक म्हटली की गावकी-भावकी आणि जातीचे राजकारण. इथे पक्षाचा झेंडा नसतो. गावकी-भावकीचे राजकारण तालुका, जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या पुढाऱ्यांनाही जुमानत नाही
शिरूर : ग्रामपंचायत निवडणूक म्हटली की गावकी-भावकी आणि जातीचे राजकारण. इथे पक्षाचा झेंडा नसतो. गावकी-भावकीचे राजकारण तालुका, जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या पुढाऱ्यांनाही जुमानत नाही, हे या निवडणुकांमध्ये दिसून येते. अनेक पुढाऱ्यांच्या गावातच विरोधकांची सत्ता असते. हे चित्र शिरूर तालुक्यात आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास अनेक वेळा जिल्हा बँकेवर निवडून आलेल्या निवृत्तीअण्णा गवारी यांच्या गावात (विठ्ठलवाडी) विरोधकांची सत्ता आहे.
शिरुर तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरेंचे हिरवे, माजी आमदार अॅड. अशोक पवार यांचे वडगाव-रासाई, पोपटराव गावडे यांचे टाकळी-हाजी, सूर्यकांत पलांडे व जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे यांचे मुखई, माजी गृहराज्यमंत्री बापूसाहेब थिटे यांचे केंदूर, जिल्हा परिषद बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांचे शिक्रापूर, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांचे जातेगाव, मनीषा कोरेकर यांचे न्हावरे, सदस्य भाऊसाहेब शिंदे यांचे कान्हूर मेसाई, सदस्य नंदकुमार पिंगळे यांचे पाबळ, पंचायत समिती सदस्य आनंदराव हरगुडे यांचे सणसवाडी, सदस्य कल्पना पोकळे यांचे कवठे-येमाई, सदस्य भगवान शेळके यांचे पिंपळे-जगताप, घोडगंगा कारखान्याचे संचालक पांडुरंगअण्णा थोरात यांचे आमदाबाद, खरेदी-विक्री संघाचे माजी सभापती शरद कालेवार यांचे शिंदोडी आदी प्रमुख नेत्यांच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
गवारी यांच्या गावात त्यांच्या विरोधी गटाची सत्ता आहे. माजी गृहराज्यमंत्री थिटे हे केंदूर गावचे असले तरी ग्रामपंचायत निवडणुकीत ते अथवा त्यांचे चिरंजीव लक्ष घालत नाहीत. आजी आमदार पवार व गावडे यांचे मात्र गावच्या निवडणुकीवर लक्ष असते व त्यांनी त्यांचे वर्चस्व कायम राखण्यात यशही मिळवले आहे. आर्थिकदृष्ट्या झपाट्याने वाढणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावरील शिक्रापूर ग्रामपंचायतीवर सध्या मंगलदास बांदल यांचे वर्चस्व आहे. डावपेचात माहिर असणारे बांदल याही वेळेस सत्ता स्वत:कडे ठेवण्यासाठी प्रयत्न करणार हे निश्चित. मात्र, इच्छुकांच्या भाऊगर्दीचे गणित ते कसे सोडवतात, यावर यश अवलंबून असेल. कारण आर्थिक सुबत्ता आल्याने प्रत्येकाला आपण सदस्य बनावे असे वाटते. हे सर्वच ग्रामपंचायतींत थोड्या अधिक प्रमाणात दिसून येते. न्हावरेमध्ये ठराविक एका गटाचे वर्चस्व दिसून येत नाही. वार्डनिहाय पुढाऱ्यांचे वर्चस्व दिसते. यामुळे वार्डनिहाय निवडून आल्यावर सत्तेची गणितं मांडली जातात. सध्या सरपंच असलेले गौतम कदम हे तसे राष्ट्रवादीसमर्थक; मात्र ते भाजपाचे आमदार बाबूराव पाचर्णे यांचेही खंदे समर्थक आहेत. जि. प. सदस्या मनीषा कोरेकर यांचे कोरेकर कुटुंबाचे गावावर वर्चस्व आहे. मात्र सर्व सदस्य त्यांच्याच विचारांचे निवडून येतील हे सांगता येणार नाही.
पाबळसह जी ३९ गावे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली, तेव्हापासून विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हेच स्वत: ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घालत आहेत. मागील आठवड्यात वळसे पाटील यांनी संबंधित गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आढावाही घेतला. यामुळे या ३९ गावांपैकी ज्या गावात पदाधिकारी राहतात त्यांचा भार काही अंशी कमी झाला. अॅड. नंदकुमार पिंगळे हे पाबळचे आहेत, मात्र त्यांच्या गावात त्यांचे एकहाती वर्चस्व नाही. प्रकाश पवार यांच्या जातेगाव बुद्रुक गावाचे राजकारण पवार व उमाप घराण्याभोवती फिरते. आताचे सरपंच सुभाष उमाप व प्रकाश पवार हे मावसभाऊ. उमाप मात्र मंगलदास बांदल यांचे समर्थक. पवार व बांदल यांच्यात फारसे सख्य नाही. यामुळे सत्ता कोणाची येणार याचे औत्सुक्य निर्माण झाले आहे. (वार्ताहर)