जोरदार शक्तिप्रदर्शनाने झाली प्रचाराची सांगता
By Admin | Published: February 20, 2017 03:22 AM2017-02-20T03:22:35+5:302017-02-20T03:22:35+5:30
महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांनी प्रभागांमध्ये मोठ्या रॅली, पदयात्रा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन करून
पुणे : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांनी प्रभागांमध्ये मोठ्या रॅली, पदयात्रा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन करून प्रचाराची सांगता केली. प्रभागातील सर्व गल्लीबोळ पिंजून काढत उमेदवारांनी मतदारांकडे कौल मागितला. वाहनांना लावण्यात आलेले पक्षाचे झेंडे, रिक्षाच्या स्पिकरवरून वाजणारी प्रचाराची गाणी, कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली घोषणाबाजी यामुळे संपूर्ण शहर निवडणूकमय झाल्याचे चित्र शहरात दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, काँग्रेस, शिवसेना व मनसे या प्रमुख पक्षांसह सर्वच उमेदवारांनी शेवटच्या दिवशी प्रचाराचा जोरदार धडाका उडवून दिला. शेवटच्या दिवशी रॅली, पदयात्रेला मोठी गर्दी जमवून एकप्रकारे शक्तिप्रदर्शनच पार पाडण्यात आले. प्रभागातील सर्व भाग पिंजून काढून प्रचारावर अखेरचा हात फिरविण्यात आला. बहुतांश उमेदवारांकडून सकाळी लवकर पदयात्रा व रॅलींना सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत बहुतांश उमेदवारांनी प्रचाराची समाप्ती केली होती.
राज्यातील १० महापालिका व २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ११ जानेवारी रोजी जाहीर केला. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार निवडीची धांदल सुरू झाली. मात्र निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (३ फेब्रुवारी) सर्वच पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर केली. महापालिकेच्या १६२ जागांसाठी ११०२ उमेदवारांची परस्परांमध्ये लढत होत आहे.
महापालिकेची निवडणूक यंदा प्रथमच ४ सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे, त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी मोठी धावाधाव करावी लागली. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांनी भर दिला. दुसऱ्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू, एमआयएमचे ओवेसी बंधू यांच्या सभा झाल्या. सभांमध्ये झालेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, विकास करण्याच्या आणाभाका यांनी वातावरण चांगलेच तापले आहे.
जाहीर प्रचाराचा रविवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमेदवारांनी मतदारसंवादावर भर दिला. सकाळपासून प्रभागांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची फेरी काढली होती.
पुढे पक्षाच्या उमेदवारांची माहिती देणारे भोंगे, त्यापाठोपाठ जिप्सीत उमेदवार, त्यापाठोपाठ शेकडो दुचाकी आणि चारचाकी गाड्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
चौकाचौकांत आणि सोसायट्या-सोसायट्यांमध्ये गेल्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी, येऊन येऊन येणार कोण... या घोषणांनी परिसर दणाणून निघाला.
प्रत्येक प्रभागात जेवणावळींना ऊत आला होता. एखादे मंगल कार्यालय किंवा मोठे मैदानाच्या ठिकाणी बेत आखला होता. या ठिकाणी शक्यतो शाकाहारी भोजन होते. मात्र, रात्री अनेक ठिकाणी सामिष बेत होता. अनेक ठिकाणी गोडधोड पदार्थ आणि मिनरल वॉटरची सोय होती. शिवाय पदयात्रेत अल्पोपाहाराच्या पाकिटांचे वाटप केले. भोजनानंतर काही ठिकाणी आइस्क्रीम, थंड पेय यांची स्वतंत्र सोय होती.
उमेदवार सतर्क ...
निवडणुकीच्या कॉर्नर सभा, पदयात्रांसाठी पोलिसांची परवानगी घेणे, त्यासाठीचे नियोजन करणे, निवडणूक आयोगाला दैनंदिन खर्च सादर करणे, प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आदी अनेक पातळ्यांवर उमेदवार लढताना दिसून आले.
प्रचार समाप्त करण्यासाठी सायंकाळी साडेपाचची वेळ देण्यात आली; मात्र त्यापूर्वीच उमेदवारांनी प्रचाराची सांगता केली. रविवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभा घेतल्या.