भारत प्रश्न तडीस नेण्याचे सामर्थ्य ; आम्हाला कोणाची मध्यस्थी नको
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 08:04 PM2019-09-26T20:04:55+5:302019-09-26T20:05:11+5:30
काश्मीरची एक इंचही जमीन पाकिस्तानला मिळू देता कामा नये. एक घाव दोन तुकडे करण्याची आता खरी वेळ आली आहे..
पुणे : पाक व्याप्त काश्मीर हा भारताचाच अविभाज्य घटक आहे. भारताच्या लष्करी सामर्थ्याच्या विरुद्ध १० पाकिस्तान उभे राहिले तरी ते बेचिराख होतील. पाक व्याप्त काश्मीरचा प्रश्न चिघळत ठेवण्यात चीनचा असणारा धूर्त हेतूही अनेकदा जगासमोर आला आहे. परंतु, काश्मीरची एक इंचही जमीन पाकिस्तानला मिळू देता कामा नये. एक घाव दोन तुकडे करण्याची आता खरी वेळ आली आहे. हा प्रश्न तडीस नेण्याचे सामर्थ्य आपल्या देशात असून, याविषयी कोणाचीच मध्यस्थी आम्हाला नको, अशा स्पष्ट शब्दांत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. दत्तात्रय शेकटकर यांनी ठणकावले.
कलम ३७० हटवून काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. सर्वार्थाने भारतापुढे कमजोर असणा-या पाकिस्तानकडून आता अणू बॉम्बच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. परंतु, हा विचारही त्यांच्यासाठी घातक ठरेल. त्यांनी ही चूक केल्यास त्यांचे अस्तित्व नकाशातून नष्ट होईल. पाकिस्तानचा भूभाग शोधण्यासाठी पुन्हा एखाद्या वास्को द गामाला यावं लागेल,असा शेकटकर यांनी पाकिस्तानला गर्भित इशाराही दिला.
भारतीय जनता पक्षाचे सदस्य, कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्यातर्फे त्यांचे ह्यकलम ३७०, काश्मीर आणि आपणह्ण या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक अजय खेडेकर, अमोल बालवडकर, दीपक पोटे, किरण दगडे पाटील, व्हीजन नेक्स्ट फाउंडेशनचे प्रमुख डॉ. अंबरीश दरक, सामजिक कार्यकर्ते दत्ताजी गायकवाड, विनोद सातव उपस्थित होते. डॉ. शेकटकर यांनी समर्पक दाखले देत अत्यंत विस्ताराने काश्मीर विषय आपल्या व्याख्यानातून मांडला. दुसरे महायुद्ध, पाक व्याप्त काश्मीर, चीनची कटकारस्थाने, भारताची मवाळ भूमिका, फोफावलेला आंतकवाद, आर्थिक, राजकीय, सामाजिक समीकरणे अशा चौफेर संदभार्तून त्यांनी अत्यंत नेमक्या शब्दांत काश्मीर प्रश्नाचे विश्लेषण केले.
बापट म्हणाले, आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आजची तरुण पिढी फार अलिप्तपणे पाहत आहे याची खंत वाटते. जर या परिस्थितीत बदल झाला नाही तर आंतकवाद आपल्या दारात येईल. याचे गांभीर्य समजवण्यासाठी डॉ. शेकटकर यांनी पुस्तक लिहून हा प्रश्न घरोघरी पोहोचवावा.