महिलांमध्ये समाजपरिवर्तनाची ताकद - हर्षवर्धन पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 02:52 AM2017-12-10T02:52:59+5:302017-12-10T02:53:07+5:30
काँग्रेसच्या काळात महिला बचत गटांना ४ टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देत महिला आर्थिक सबलीकरणाचे धोरण स्वीकारले होते. पुरुषांसोबतच महिलांनीही व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे यावे, याकरिता काँग्रेसने समानतेचा संदेश देत पुढाकार घेतला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : काँग्रेसच्या काळात महिला बचत गटांना ४ टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देत महिला आर्थिक सबलीकरणाचे धोरण स्वीकारले होते. पुरुषांसोबतच महिलांनीही व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे यावे, याकरिता काँग्रेसने समानतेचा संदेश देत पुढाकार घेतला होता. महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्यास, गावागावांतील दारूची बाटली उलटी करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असल्याचे दाखवून दिले आहे, असे मत माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात स्व.इंदिरा गांधी जन्मशताब्दी उद्योगिनी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी पाटील बोलत होते. माजी आमदार उल्हास पवार, सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, इंटकचे अध्यक्ष कैलास कदम, नगरसेविका सुजाता शेट्टी, लता राजगुरू, प्रशांत सुरसे, आयुब पठाण, चेतन आगरवाल, उमेश काची, स्वाती शिंदे, कन्हैयालाल साहनी आदी उपस्थित होते. उस्मानाबाद येथील बचत गटाच्या चळवळीतून पुढे आलेल्या महिला उद्योजिका कमल कुंभार यांना मुख्य पुरस्काराने गौरविण्यात आले.
पाटील म्हणाले की, सेवा, कर्तव्य, त्याग या तिन्ही शब्दांचे तंतोतंत पालन कोणत्या पक्षाने केले याचे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायला हवे. काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळापासून याचे पालन केले असून, सर्वधर्मसमभावाचा विचार घेऊन देश बांधण्याचे काम केले आहे.
पवार म्हणाले की, मनामध्ये जिद्द असेल तर महिला कोणतेही काम करू शकतात. मात्र, सध्याचे पंतप्रधान हे इंदिरा गांधी यांचे नाव पुसण्याचे काम करीत आहेत, ते त्यांच्या ७ पिढ्यांनाही जमणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
जोशी म्हणाले की, पुण्यात बचत गटांची मोठी चळवळ सुरू असून, त्यातून अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. आजच्या युगात बचत गटांना मार्केटिंगची आणखी गरज असून त्यांना ताकद देण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. विकास आबनावे यांनी प्रास्ताविक केले. संगीता तिवारी यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. रमेश पवळे यांनी आभार मानले.
शेळीपालन, कुकुटपालनापासून अनेक व्यवसाय कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता शेतजमिनी भाड्याने घेऊन केले. व्यवसायासाठी आपल्या गावातील भौगोलिक रचना, मागणी आणि इतर व्यवसायांची माहिती महिलांनी करून घेणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील ज्या महिला स्वत:चा व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत, त्यांना आजूबाजूंच्या व्यवसाय क्षेत्राचे ज्ञान देण्यापासून ते कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याकरिता मदत करण्याचे माझे स्वप्न आहे. पुढील वर्षी २०१८ मध्ये तब्बल १० हजारहून अधिक महिलांना लघुउद्योजिका बनविण्यास मी साहाय्य करणार आहे.
- कमल कुंभार