सौर ऊर्जेतून कृषि पंपांना वीज : चंद्रशेखर बावनकुळे; वारजेत सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:35 PM2018-02-22T12:35:03+5:302018-02-22T12:39:01+5:30
येत्या तीन वर्षात राज्यातील ९० टक्के शेती पंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवसा देखील वीजपुरवठा होणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पुणे : येत्या तीन वर्षात राज्यातील ९० टक्के शेती पंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवसा देखील वीजपुरवठा होणार असून, वीजपुरवठ्याचा प्रतियुनिट दर देखील निम्म्यावर येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि.२१) येथे दिली.
वारजे येथील आदित्य गार्डन सिटी सोसायटीमध्ये दीडशे किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. आमदार भीमराव तापकिर, महाऊर्जाचे महासंचालक राजाराम माने, एमएसईबी सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक, महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे, नगरसेवक दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका दिपाली धुमाळ, नगरसेविका सायली वांजळे, सोसायटीच्या अध्यक्ष साक्षी महाले या वेळी उपस्थित होते.
ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, की पूर्वी सौरऊर्जेवरील वीजनिर्मितीसाठी प्रतियुनिट १६ रुपये खर्च येत होता. केंद्र व राज्य सरकारने सौरऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन दिल्याने हा खर्च प्रतियुनिट तीन ते साडेतीन रुपयांवर खाली आला आहे.
शहरी व ग्रामीण भागात सौरऊर्जेवरील प्रकल्पात वाढ होत आहे. या सोबतच राज्यातील सुमारे ४५ लाख शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने सौर ऊर्जेवरील कृषी वाहिन्यांच्या प्रकल्पाला चालना दिली आहे. या महत्वाकांक्षी सौर प्रकल्पाद्वारे येत्या तीन वर्षांत राज्यातील ९० टक्के शेतीपंपांना वीजपुरवठा करण्याचे नियोजन आहे.
विवेक रत्नपारखी यांनी प्रास्ताविक केले. सोसायटीचे माजी अध्यक्ष सुनील ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. तर, नगरसेवक सचिन दोडके यांनी आभार मानले.
अडीच हजार मेगावॉट विजेची मागणी कमी होईल
पारंपरिक वीजनिर्मितीद्वारे शेतीपंपांना वीजपुरवठ्यासाठी येणारा प्रतियुनिट सहा रुपये खर्चही तीन रुपयांवर येणार आहे. याशिवाय कोळशावरील सुमारे अडीच हजार मेगावॉट विजेची मागणी कमी होईल व त्याचा पर्यावरणाला फायदा होणार असल्याचे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.