वालचंदनगर उपविभागात थकीत १२०० कृषी पंपाचा विद्युत पुरवठा केला खंडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 12:57 PM2021-11-20T12:57:05+5:302021-11-20T12:59:39+5:30
येथील वालचंदनगर उपविभागात लासूर्णे, भिगवण, वालचंदनगर, तावशी व शेळगाव असे सहा सेक्शन येतात. या मधील सुमारे १२०० कृषी पंपाचा विद्युत पुरवठा थकबाकीमुळे महावितरणने खंडित केला आहे
लासुर्णे (पुणे): वालचंदनगर उपविभागातील सहा सेक्शनमधील सुमारे १२०० कृषी पंपाचा विद्युत पुरवठा थकबाकीमुळे महावितरणने खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे हाता तोंडाला आलेली पिके वाया जाणार आहेत. आगोदरच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच महावितरण कंपनीने 'शॉक' दिल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
येथील वालचंदनगर उपविभागात लासूर्णे, भिगवण, वालचंदनगर, तावशी व शेळगाव असे सहा सेक्शन येतात. या मधील सुमारे १२०० कृषी पंपाचा विद्युत पुरवठा थकबाकीमुळे महावितरणने खंडित केला आहे. वीजपुरवठा खंडित केल्याने पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. या भागात शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय केला जातो. तसेच या भागात जनावरांची संख्या आधिक आहे. महावितरणच्या या कारवाईमुळे या भागातील पशुपालन व्यवसाय कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.
नितीन माने या शेतकऱ्याने ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, अगोदरच शेतकरी अडचणीत आहे. यात आणखी महावितरणने कृषी पंप बंद करून शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. यामुळे जनावरांचा ओला चारा जळून जाणार आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय जो केला जातो तो देखील कोलमडणार आहे.
शरद जोशी विचार मंच प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी सांगितले की, महावितरण कंपनीने घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून न्यायालयाच्या विरोधात घेतलेला आहे. कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यास बारामती, पुणे व मुंबईचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला आहे.
उपविभागात १०६ कोटी थकबाकी आहे. कृषी योजनेतील माफ करुन भरावायाची थकबाकी व सप्टेंबर २०२० ते सप्टेंबर २०२१ च्या चालू बिलातील रक्कम भरुन महावितरणला सहकार्य करावे.
-एम. व्ही. सुळ (वालचंदनगर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता)